नांदेड,(प्रतिनिधी)- बार्टी हिंगोली तर्फे अंधश्रद्धा निर्मूलन समिती चा ‘अंधश्रद्धा निर्मूलन व चमत्कार सादरीकरण’ या विषयी आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात प्रमुख वक्ते व चमत्कार सादरकर्ते इंजि. सम्राट हाटकर म्हणाले, की जगामध्ये कोणालाही चमत्कार करता येत नाही. विज्ञानाचा आधार घेऊन अवैज्ञानिक दावा करणारे बुवा, बाबा, महाराज जनतेच्या अगतिकतेचा व अज्ञानाचा फायदा घेऊन जनतेला लुबाडत असतात. ते पुढे असेही म्हणाले, की तथाकथित चमत्कार हे तर भौतिक प्रक्रिया असते, रासायनिक प्रक्रिया असते, एखादी यांत्रिकी स्वरूपाची यंत्रणा असते किंवा हा चला काहीतरी असते. त्याला दैवी शक्तीचा टेकू दिल्यामुळे लोक शंका घेण्यास घाबरतात म्हणून प्रश्न विचारत नाहीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला
‘चमत्काराची परंपरा या धर्तीवर वाढली, भोंदू बुवांच्या चमत्काराला दुनिया ही भाळली’ हे गीत सम्राट हाटकर यांनी घेतले. मंत्राने अग्नी पेटवणे, वस्तू गायब करणे, हवेत हात फिरवून वस्तू काढणे, काठावर वस्तू तोलणे, रिकाम्या भांड्यातून तीर्थ (पाणी) काढणे, पाण्याचा प्रसाद बनवणे असे चमत्कार सादर करून त्यामागील विज्ञान समजून सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे होते. ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की बार्टीच्या अंतर्गत समता दूत प्रकल्पाची स्थापना समाजप्रबोधनासाठीच झाली आहे. सामाजिक विभागाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करण्याबरोबरच संबंधित योजनांचा लाभ लोकांना मिळवून देण्यासाठी समता दूत सतत कार्यरत असतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ गाडेकर यांनी तर आभार प्रदर्शन मिलिंद आळणे यांनी केले.या ऑनलाईन कार्यक्रमास बार्टी जालना चे प्रकल्प अधिकारी मंजाजी काबळे, सरपंच प्रकाश मगरे (पार्डी)प्रणव आळणे, सुरेश कुसळे, अंनिस चे विजया पिटलेवाड, कमलाकर जमदाडे, इंजि.विजया मुखेडकर, उषा गैनवाड, प्रकाश पाईकराव, सुनिता आवटे, संगिता खांदळे, अँड रहिम कुरेशी, मंगेश गाडेकर, सुरेश पठाडे, प्रफुल्ल पटेबहादूर, गजानन अभोरे, सुकेश काबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चमत्कार करणारे बुवा, बाबा, महाराज जनतेला फसवतात ; बार्टी आयोजित अंनिसच्या कार्यक्रमात चमत्कारी बाबानां आव्हान