इतर एकूण सहा चोरीच्या गुन्ह्यामध्ये 11 लाख 82 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-कर्तबगार नांदेड ग्रामीण पोलीसांच्या हद्दीतून 10 लाखांचा अख्खा ट्रक चोरीला गेला आहे. धर्माबाद शहरात 47 हजार 500 रुपयांची घरफोडी झाली आहे. देगलूर, शिवाजीनगर, हिमायतनगर, आणि नांदेड ग्रामीण या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 4 मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. चोऱ्यांच्या या सहा प्रकारांमध्ये 11 लाख 82 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोंढार वळण रस्त्यावर उभा असलेला ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.ई.2448 हा 6 मे रोजी रात्री 10 ते 7 मेच्या पहाटे 8 वाजेदरम्यान कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे अशी तक्रार सुखदेवसिंघ दलविरसिंघ बुटर यांनी दिली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी जून महिन्याच्या दुसऱ्या दिवशी हा 10 लाखांचा ट्रक चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 10 लाखांच्या ट्रक चोरीचा तपास पोलीस अंमलदार कदम यांच्याकडे देण्यात आला आहे.

धर्माबाद शहरातील चंद्रबाई श्रावण कुंभारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 मे च्या सकाळी 11 ते 2 जूनच्या सकाळी 9 वाजेदरम्यान त्यांचे घर बंद करून त्या आपल्या माहेरी गेल्या होत्या. या दरम्यान चोरट्यांनी त्यांचे घरफोडून त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा एकूण 47 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. धर्माबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार स्वामी अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गाडेगाव रस्त्यावरील रहेमानीया कॉलनी येथील मोहम्मद आसेफ, मोहम्मद याकुब यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एन.1428 ही 60 हजार रुपये किंमतीची गाडी 29 मे च्या रात्री 1.30 ते पहाटे 5 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कदम हे अधिक तपास करीत आहेत.
भास्कर हणमंतराव तोटावार यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.जी.0257 ही 25 हजार रुपये किंमतीची गाडी 1-2 जूनच्या रात्री जुना मोंढा देगलूर येथील त्यांच्या आडत दुकानासमोरून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 25 हजार रुपये आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार ताहेर अधिक तपास करीत आहेत.
हिमायतनगर येथील चंद्रकांत देविदास आकलवाड यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.व्ही. 2849 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी अष्टविनायक हॉस्पीटलसमोरून 2 जूनच्या सायंकाळी चोरीला गेली आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार लक्षटवार हे अधिक तपास करीत आहेत.
रमेश उग्रसेनराव मुखेडकर यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.जी.4825 ही 20 हजार रुपये किंमतीची गाडी हनुमान मंदिराच्या शेजारी उभी होती. ती 1 जून रोजी दुपारी 2 ते रात्री 8.30 दरम्यान चोरीला गेली. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार मठदेवरु अधिक तपास करीत आहेत.