दंडणीय कारवाईचा प्रस्ताव राज्य तेल समन्वयकाकडे पाठवा : पुरवठा विभागाचे निर्देश
नायगाव (प्रतिनिधी)- पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या सुविधा ग्राहकांच्या कायदेशीर हक्कात येतात. मात्र पंपचालक सुविधा देण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचे वृत काही वर्तमानपत्रात प्रकाशित झाले होते. या वृताची जिल्हा पुरवठा विभागाने दखल घेतली असून कंपणीच्या नियमानुसार ज्या सुविधा आहेत त्या ग्राहकांना उपलब्ध करुन द्याव्यात. याबाबत तक्रारी आल्यास पेट्रोल पंपाविरोधात दंडणीय कारवाईचा प्रस्ताव तेल समन्वयक महाराष्ट्र राज्य यांचेकडे सादर करण्यात येईल असा इशारा आपल्या स्तरावरुन देण्यात यावा असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सर्व तेल कंपण्याच्या विक्री अधिकाऱ्यांना दि. ४ जुन रोजी दिले आहेत.
पेट्रोल पंपाची उभारणी करताना पंप मालक या सुविधांची निर्मिती करतात पण ती सेवा ग्राहकांना देत नाहीत. पेट्रोल पंप कंपणीच्या नियमानुसार प्रत्येक पंपावर महीला व पुरुष स्वच्छालय, हवा भरण्याची सोय, शुध्द पाणी व प्राथमिक उपचारासाठी उपचार पेटी असणे बंधनकारक आहे. मात्र परवडत नसल्याचे कारण दाखवून ग्राहकांना सेवा देण्यात येत नाही. प्रत्येक पंपावर या सुविधा आहेत परंतु त्या केवळ देखाव्यासाठीच आणि नियमांची पुर्तता करण्यासाठी उरल्या आहेत. याबाबत काही वर्तमानपत्रात वृत प्रकाशित झाले होते.
दैनिकात आलेल्या वृताची दखल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घेतली असून जिल्ह्यातील आयवोसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल, इस्सार आँईल, नयारा एनर्जी लिमिटेड व रिलायन्स पेट्रोल अदि कंपण्यांच्या विक्री अधिकाऱ्यांना बातमीचे कात्रण जोडून एक खरमरीत पत्र पाठवले आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील आपल्या कंपणीच्या पेट्रोल पंप चालकांना /व्यवस्थापकांना कंपणीच्या नियमानुसार ग्राहकांना द्यावयाच्या सोई/सुविधा ठेवण्यात याव्यात आणि सदर सुविधांचा लाभ ग्राहकांना घेवू द्यावा. तक्रार अथवा वर्तमानपत्रात बातम्या येणार नाहीत याची खबरदारी घेण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. तक्रार आल्यास तेल कंपणीच्या नियमानुसार आपल्यावर दंडणीय कारवाई करण्यात येईल असे आपल्या स्तरावरुन सुचना द्याव्यात. तसेच पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल/डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना चांगल्या भाषेत संवाद साधावा अरेरावीची भाषा वापरु नये असे सुचीत करावे असे नमूद केले आहे.
पेट्रोल पंप तपासणीच्या वेळी कंपणीच्या नियमानुसार सोई सुविधा आढळून आल्या नाही तर पेट्रोल पंपाविरोधात दंडणीय कारवाईचा प्रस्ताव तेल समन्वयक महाराष्ट्र राज्य यांचेकडे सादर करण्यात येईल असेही सुचीत करण्यात यावे कळवले आहे. दै. सकाळच्या वृताची जिल्हा पुरवठा विभागाने दखल घेवून पेट्रोल कंपण्यांच्या विक्री अधिकाऱ्यांना दि. ४ जुन रोजी सुचना वजा इशारा दिला आहे. विक्री अधिकारी व पंप चालक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या सुचनेचे व आदेशाचे कसे पालन करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.