नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड येथील गुरूद्वारा सचखंड बोर्डची 13 जून रोजी होणारी बजेट बैठक व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्याचा निर्णय झाला. यावर गुरूद्वारा बोर्डाच्या दोन सदस्यांनी फक्त बजेटसाठी आम्ही या मिटींगचे आम्ही समर्थन करतो, पण इतर विषयांबद्दल प्रत्यक्षात मिटींग झाली पाहिजे, असे एक निवेदन गुरूद्वारा बोर्डाच्या दोन सदस्यांनी गुरूद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भुपिंदरसिंघ मनहास यांना दिले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालयातून सुद्धा देण्यात आली आहे.
नांदेड गुरूद्वारा बोर्डाचे निर्वाचीत सदस्य स. मनप्रितसिंघ कुंजीवाले आणि स. गुरमीतसिंघ महाजन यांनी दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, 13 जून रोजी गुरूद्वारा बोर्डाच्यावतीने बजेट बैठक 2021-22 झुम मिटींगद्वारे आयोजित करण्यात आली आहे, त्यात एकूण 20 विषय आहेत. बजेट वगळता इतर विषयांवर झुम मिटींगमध्ये चर्चा होऊ शकत नाही, असे सदस्यांचे म्हणणे आहे. मार्च महिन्यानंतर झालेल्या घटनांच्या पार्श्वभुमिवर बजेट बैठक होण्यासाठी उशीर झाला आहे. अनेक बोर्ड कर्मचाऱ्यांचे वेतन मिळालेले नाही, त्यांना त्रास होत आहे. तेव्हा आम्ही बजेट संदर्भाने या झुम मिटींगचे समर्थन करतो, परंतु इतर विषयांवर चर्चा झुम मिटींमध्ये होऊ शकत नाही असे आमचे मत आहे.
13 जूनच्या मिटींगमध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे इतर विषयांवर सविस्तर चर्चा करणे अवघड आहे.सध्या महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन प्रक्रिया नियमीत केली आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे बैठक झाली आहे, असे सदस्य सांगतात. या पुर्वीची बोर्ड मिटींग 18 जुलै 2020 रोजी झाली होती, त्याला आता जवळपास एक वर्षे झाले आहे. या दिवसांमध्ये गुरूद्वारा बोर्डाचे अध्यक्ष कधीच नांदेडला आले नाही. 29 मार्च रोजी झालेल्या दुर्घटनेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा आवश्यक आहे. सध्याच्या गुरूद्वारा बोर्डाला या घटनेतून डाग लागला आहे, अशी घटना इतिहासात पहिली आहे. याचा जबाबदार कोण? यावर चर्चा होणे आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत त्यासाठी काय कार्यक्रम राबविण्याची गरज आहे, हे सुद्धा सुनिश्चित करायचे आहे. त्यासाठी जुलै 2021 मध्ये नांदेडमध्ये बोर्ड मिटींग प्रस्तावित करणे आवश्यक आहे.
या बैठकीत गुरूद्वारा बोर्डाच्या अनेक बडतर्फ आणि निलंबीत कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. 28 मार्च 2021 रोजी बैठकीत निश्चित झाल्याप्रमाणे त्या कर्मचाऱ्यांना नियमीत कामावर घेणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे निधन झाले, त्यांच्या वारसांना गुरूद्वारा बोर्डात नोकरी देणे हा विषय प्रलंबित आहे. अनेक चौकशी प्रकरणे प्रलंबित आहेत. मागील दोन वर्षांपासून रोजनदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे हा विषय प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा विषय प्रलंबित आहे. अशा अनेक विषयांमुळे यावर सकारात्मक चर्चा घडवून त्यावर निर्णय घ्यायचे असतील तर झुम मिटींगमध्ये फक्त बजेटबद्दल चर्चा होईल आणि इतर विषयांसाठी जुलै महिन्यात प्रत्यक्ष मिटींग आयोजित करावे असे या निवेदनात लिहिले आहे. या निवेदनावर गुरूद्वारा बोर्ड सदस्य मनप्रीतसिंघ कुंजीवाले आणि गुरमीतसिंघ महाजन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गुरूद्वारा बोर्डाच्या झुम मिटींगवर महाजन आणि कुंजीवाले या सदस्यांना आक्षेप