नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्यात रस्ता राखून मारहाण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात अजबच माहिती खात्रीलायक सुत्रांनी सांगितली आहे. मारहाण करणाऱ्यांनी त्या युवकाकडून खिशातील 40 हजार रुपये आणि घरातून मागवून 10 लाख रुपये लुटून नेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सोबतच त्या ठिकाणी जमीनीवर गोळीबार करण्यात आला असेही काही जण सांगतात.

अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 135/2021 दाखल आहे. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 341, 324 जोडण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार नंदकिशोर कस्तुरकर (पिल्लू) हा व्यक्ती आहे. तक्रारीच्या अभिलेखात रस्ता रोखून अज्ञात लोकांनी मारहाण केल्याचा मजकुर लिहिलेला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.सहाय्यक पोलीस निरिक्षक रामकिशन नांदगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक कपील आगलावे अधिक तपास करीत आहेत.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदकिशोर कस्तुकरला ज्या लोकांनी उचलून नेले त्यांनी जवळपास त्याला 4 तास मारहाण केली आहे. त्याच्या खिशात 40 हजार रुपये होते ते तर घेतलेच सोबतच त्याच्या पायाजवळ जमीनीवर गोळीबार करून दहशत निर्माण केली. आणि त्याच्याच फोनवरून त्याच्याच घरी सांगून दहा लाख रूपये मागवले अशा प्रकारे 10 लाख 40 हजार रुपये या मारहाण करणाऱ्यांनी नेले असल्याची अत्यंत खात्रीलायक माहिती आहे.
पण नंदकिशोर कस्तुरकरने आपल्या तक्रारीत सुध्दा याचा कांही एक उल्लेख केलेला नाही. नंदकिशोर कस्तुरकर अगोदर पोलीस अधिक्षक कार्यालयात आले होते. पोलीसांनी त्यांच्या मदतीला पोलीस पथकही पाठवले होते. पण नंदकिशोर कस्तुरकरने 10 लाख 40 हजार रुपये नेले आहेत ही घटना का लपवून ठेवली हे सुध्दा मोठे गौड बंगाल आहे.