माझे नाव खोटेच गोवण्यात अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि पोलीस अंमलदार राजदीपसिंघ यांचा हात ! ; सरदार रणदीपसिंघ यांचा आरोप

नांदेड (प्रतिनिधी)- 29 मार्च रोजी झालेल्या गुन्ह्यात माझे नाव अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि पोलीस अंमलदार राजदिपसिंघ (दिपा) यांच्यासोबत संगणमत करून गोवण्यात आले आहे, असा आरोप स. रणदिपसिंघ सरदार यांनी एका निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासमक्ष केला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री,गृहमंत्री,मानवी हक्क आयोग, ना.अशोकराव चव्हाण,खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ.मोहन हंबर्डे,आ.अमर राजूरकर,पोलीस महानिरीक्षक नांदेड,जिल्हाधिकारी नांदेड,माजी आ.डी.पी सावंत,पोलीस अधीक्षक नांदेड,पोलीस उप अधीक्षक नांदेड शहर आणि पोलीस निरीक्षक वजिराबाद यांना पाठविण्यात आल्या आहेत.
नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात 29 मार्च रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्र. 114/2021 मध्ये 77 दिवसांच्या तपासानंतर स. रणदिपसिंघ (दिपू) ईश्वरसिंघ खालसा याचे नाव आरोपी रकान्यात आले. सोबतच 25 मे रोजीच हा सर्व प्रकार घडला आणि सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे आणि पोलीस अंमलदार संजय जाधव यांची चौकशी लागली. सोमनाथ शिंदे यांना दुसऱ्या दिवशी परभणी जिल्ह्यात नियंत्रण कक्षात पाठवून दिले. अद्याप चौकशीचा निर्णय आलेला नाही. या चौकशीमध्ये रणदिपसिंघ सरदार यास पोलीस ठाण्यातून पळवून दिल्याचा आरोप चौकशीदरम्यान त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. या चौकशीतून काय निष्पन्न झाले, याची माहिती मात्र अद्याप मिळालेली नाही. यानंतर रणदिपसिंघ सरदारने माझे नाव प्रविण ओमप्रकाश पोकर्णा, अक्षय रावत, हरप्रितसिंघ मेजर आणि सतपालसिंघ खालसा यांनी आपल्याकडे असलेल्या राजकीय वजनाचा वापर करून गोवले असल्याचा आरोप एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केला होता.
त्यानंतर आता पुन्हा दि. 19 जून 2021 रोजी रणदिपसिंघ सरदार यांनी एक निवेदन तयार केले असून त्या निवेदनात  माझ्या सोबतच्या माजी भागीदारांनी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि पोलीस अंमलदार राजदिपसिंघ यांच्यासोबत संगणमत करून गुन्हा क्र. 114 मध्ये गोवले असल्याचा आरोप केला आहे. आपल्या निवेदनात रणदिपसिंघ सरदार लिहितात, विजय कबाडे हे 11 मार्च 2013 ते 8 जुलै 2015 दरम्यान नांदेड शहराच्या पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यावेळी नंबर दोनचे जे काही व्यापार चालत होते, त्यांचा हप्ता (भरण) प्रविण ओमप्रकाश पोकर्णा वसुली करून विजय कबाडे यांना आणुन देत होते. विजय कबाडे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार गुन्हा 20/2018 वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने केला होता. न्यायालयाने पोलीस कोठडीतील व्यक्ती मरण पावल्यानंतर हा गुन्हादाखल करण्याचे आदेशदिले होते. मला असलेल्या माहितीप्रमाणे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या गुन्ह्यात अंतिम अहवाल पाठविला आहे. पण तो न्यायालयाने अद्याप मंजूर केलेला नाही. राज्य गुन्हे अन्वेषण शाखेने पाठविलेल्या अंतिम अहवालावर निषेध याचिका दाखल होणार आहे, असे सुद्धा मला माहित आहे. तरी पण त्यांना कार्यकारी पदावर नियुक्ती मिळाली आहे.
माझे नाव गुन्हा क्र. 114 मध्ये नोंदविण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे  यांना 15 लाख रूपये देण्यात आले. सोबतच अर्धापूरचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांना 2 लाख 50 हजार रूपये देऊन तेथे दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातून माझ्या जुन्या साथीदारांना वाचविण्यात आले आणि माझे नाव गुन्हा क्र. 114 मध्ये नोंदविण्याचा बोनस घेण्यात आला.असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
29 मार्च रोजी झालेल्या घटनेत शीख समाजाच्या अनेक गरीबांना या गुन्ह्यात फसविण्यात  आले आहे. शीख समाजातील लोकांची नावे गुन्ह्यात आहेत, असे सांगून राजदिपसिंघ त्यांच्याकडून पैसे वसुली करतो आणि त्यांचे नाव काढून देण्याची हमी देतो त्यासाठी त्याच्याकडे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आहेत, हे समाजाला  सांगतो असा आरोप या निवेदनात आहे. 29 मार्च रोजी पोलिसांवर हल्लाच का झाला याचा तपास बारकाईने केला तर त्यातून भयंकर मोठे सत्य समोर येईल, असे रणदिपसिंघ सरदारला वाटते. विजय कबाडे आणि राजदिपसिंघ यांच्या त्रासाने कंटाळून आजही शीख समाजाचे बरेच लोक घर-दार सोडून फिरत आहेत. त्याची सुद्धा योग्य चौकशी होण्याची गरज आहे. गुरूद्वारा बोर्डाच्या अध्यक्ष पदावर अध्यक्ष भुपिंदरसिंघ मिन्हास आणि उपाध्यक्ष पदावर गुरविंदरसिंघ बावा यांना स्थानिक लोकांची आवड नसताना बळजबरी बसविण्यात आले आहे. 10 ते 20 लोकांना केलेल्या 29 मार्चच्या घटनेत 84 आरोपी कसे झाले, असा प्रश्न या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. अनेकांना सोडून पण देण्यात आले त्यामुळे या गुन्ह्यातील सत्यता जाणुन घेण्यासाठी एक विशेष टीम तयार करून खऱ्या अर्थाने त्यादिवशी गडबड करणारे 10-20 जे खरे असतील त्यांना  शोधून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी पण या गुन्ह्यात 180 ते 190 जणांना फसविण्यात आले आहे. त्यांची पुर्ण चौकशी करून त्यांना दोषमुक्त करावे अशी अपेक्षा या निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनात नमुद करण्यात आलेल्या दोन घुसखोर लोकांना ताबडतोब निलंबीत करावी अशी मागणी या निवेदनात लिहिलेली आहे.
या निवेदनाच्याप्रति मुख्यमंत्री,गृहमंत्री,मानवी हक्क आयोग, ना.अशोकराव चव्हाण,खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ.मोहन हंबर्डे,आ.अमर राजूरकर,पोलीस महानिरीक्षक नांदेड,जिल्हाधिकारी नांदेड,माजी आ.डी.पी सावंत,पोलीस अधीक्षक नांदेड,पोलीस उप अधीक्षक नांदेड शहर आणि पोलीस निरीक्षक वजिराबाद यांना सुद्धा नोंदणीकृत डाकने पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *