नांदेड(प्रतिनिधी)-विष्णुपूरी येथील बाजीराव हंबर्डे यांचे खून प्रकरण नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने 36 तासात उघडकीस आणल्यानंतर काल दोन महिला आणि दोन पुरूषांना अटक झाली. आज दि.20 जून रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एल.सोयंके यांनी या चार जणांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सिडको वाघाळा रस्त्यावर 17 जून रोजी सकाळी 5 वाजता एक मृतदेह सापडला. कांही तासात हा मृतदेह बाजीराव पंडीतराव हंबर्डे (35) यांचा असल्याचे समजले. त्याच दिवशी प्रविण पंडीतराव हंबर्डे यांच्या तक्रारीवरुन अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणासाठी बाजीराव हंबर्डे यांचा खून केल्या म्हणून गुन्हा क्रमांक 392/2021 दाखल झाला. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख शेख असद यांनी कर्तव्यदक्ष, कर्दनकाळ, चपळ, सक्षम पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्यातील दोन आरोपी 18 जून रोजी रात्री ताब्यात घेतले. त्यानंतर प्राप्त झालेल्या माहितीनुसार 19 जून रोजी या आणखी दोघांची वाढ झाली. पकडलेले चार मारेकरी देविदास गोविंदराव गिरडे (43) रा.असदवन, सुरेखा अरविंद बयास (35)रा.विष्णुपूरी, राधाबाई गोपाळ गोदारे (36) रा.हडको आणि वैभव उर्फ विक्की प्रमोद मोहिते (25) रा.एमआयडीसी अशा चार लोकांना अटक दाखविण्यात आली.
आज 20 जून रोजी नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले. न्यायाधीश एस.एल.सोयंके यांनी या दोन महिला आणि दोन पुरूष अशा चार जणांना तीन दिवस अर्थात 23 जून 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
हंबर्डे खून प्रकरणातील दोन महिला आणि दोन पुरूषांना पकडल्यानंतर पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवतात तो संदेश विविध व्हॉटसऍप गु्रपवर व्हायरल केला. यावर प्रतिक्रिया, प्रतिक्रेयेवर प्रतिक्रिया असे अनेक पोस्ट झाले. ह्यावरुन तरी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी आणि पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी काय चालले आहे, कोणी काय केले आहे, ते करायला हवे की, नाही याबद्दल तपासणी जरुर केली पाहिजे. एका पोलीस अंमलदाराची कोविड कालखंडातील रजा बिनपगारी केल्यानंतर त्या पोलीस अंमलदाराने व्हॉटसऍप संकेतस्थळावर आपले दुख व्यक्त केले होते. त्याचा सुड तर खुप घेण्यात आला मग पोलीस निरिक्षकांचा काय नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.
हंबर्डे खून प्रकरणात चार आरोपींना पोलीस कोठडी