तीन चोऱ्यांमध्ये 75 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील राधिकानगर भागात दुचाकीवर जाणाऱ्या एका महिलेचे गंठन तोडल्याचा प्रकार घडला आहे. हदगाव शहरात एक ऍटो मोबाईलची दुकान फोडण्यात आली आहे. रिठा तांडा ता.किनवट येथे आखाड्यावरील घर फोडून त्यातून साहित्य चोरण्यात आले आहे. या तिन चोरी प्रकारामध्ये एकूण 75 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
सौ.मिना संजय पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास त्या आपल्या घरासमोर इतर महिलांची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी दोन अज्ञात माणसे आली आणि त्यांनी विठ्ठल रुक्मीणी मंदिरला जाणारा रस्ता त्यांना विचारला. थोड्यावेळात ते दोघे परत आले आणि त्यांच्या गळ्यातील 20 हजार रुपये किंमतीचे गंठण बळजबरीने तोडून नेले. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक आश्रुबा घाटे अधिक तपास करीत आहेत.
संदीप दत्तराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हदगाव येथील नांदेड रोडवर असलेल्या त्यांच्या मालकीच्या माऊली ऍटो मोबाईल आणि प्रशांत शामराव सांगडे यांच्या मालकीचे विद्याधन बुक सेंटर हे दोन दुकान फोडून चोरट्यांनी 23 जूनच्या रात्री 10 ते 23 जूनच्या पहाटे 9 वाजेदरम्यान त्यातून 45 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल आहे. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार हंबर्डे अधिक तपास करीत आहेत.
रिठा तांडा ता.किनवट येथील यादव लिंबाजी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 मार्च ते 1 जून दरम्यान त्यांच्या पत्नीच्या मालकीच्या शेतात आखाड्यावर बांधलेल्या खोलीचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातून 6 बॉक्स फर्शी, एक पाण्याची मोटार आणि इतर किरकोळ साहित्य असा 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ईस्लापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पोटे अधिक तपास करीत आहेत.