नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये गाजलेल्या सरकारी धान्य घोटाळा प्रकरणाचा चेंडू आता ईडीच्या पाळ्यात गेला आहे. भारताचे प्रर्वतन निदेशालय या प्रकरणात उतरले असून इंडिया मेगा अग्रो अनाज कंपनीच्या अजय बाहेती यांना सध्या न्यायालयाने 2 जुलै पर्यंत ईडीच्या कोठडीत पाठविले आहे. आता या प्रकरणाची व्याप्ती अत्यंत मोठी होणार आहे. यामध्ये कोणा-कोणाला शब्दांच्या फुलांचे सुंदर वाक्य हार तयार करावे लागतील आणि कोण-कोण त्यांचा खरा पात्र आहे. हे कांही दिवसांत समोर येईल.
नायगाव तालुक्यातील कृष्णूर या पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमध्ये इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनी आहे. कंपनीच्या मुळ कामकाजानुसार थेट शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करायचे आणि त्यावरील प्रक्रिया करून तयार होणाऱ्या वस्तुंची बाजार पेठ त्यांनी शोधायची असा मुळ उद्देश आहे. सरकारी धान्याच्या वाहतुक आणि वाटपात होणारा गोंधळ हा काही लपलेला नाही. त्यामध्ये भारतीय खाद्य निगम, वाहतुक कंत्राटदार, पुरवठा विभागाचे अधिकारी, गोदामपाल, अनेक कारकून, अवल कारकून यात गुंतलेले असतात.
नांदेडमध्ये सन 2018 च्या कलाखंडात पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा असतांना इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीमध्ये एका रात्रीला बेकायदेशीररित्या आलेले सरकारी धान्याचे 12 ट्रक पकडण्यात आले. सुरूवातीला या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक विशाल खांबे यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर धर्माबादचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर कोणी तरी कोठे तरी चाबी फिरवली तेंव्हा एका दिवशी पोलीस महासंचालकांनी नुरूल हसन यांना या गुन्ह्याच्या कागदपत्रांसोबत मुंबईला बोलावले. तपासाची सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतर पोलीस महासंचालकांनी नुरूल हसन यांना शाब्बासकीच दिली होती. पण प्रकरण पुढील तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे गेले.
त्यानंतर या प्रकरणात इंडिया मेगाचे अजय बाहेती, सरकारी धान्याचे वाहतुक कंत्राटदार ललित खुराणा, राजू पारसेवार, अनेक गोदामपाल, अनेक अव्वल कारकुन, लिपीक पकडले गेले. यामध्ये पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर मात्र सापडले नव्हते. कांही जण सांगतात की, नंतर ते परभणी येथे नोकरी करत होते. पण ते जामीनीवर होते की, त्यांच्याविरुध्द दोषारोप नव्हता याबद्दल माहिती समजली नाही.
प्राप्त माहितीनुसार दि.21 जून रोजी प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने अजय बाहेतीला एक नोटीस दिली आणि त्याला 23 जून रोजी ईडी कार्यालयात बोलावले. 23 आणि 24 जून रोजी अजय बाहेतीची प्रश्नोत्तर रुपाने तपासणी झाली आणि ईडीने 24 जून रोजी अजय बाहेतीला अटक केली. ईडी न्यायालय मुंबईने अजय बाहेतीला 25 जून ते 2 जुलै असे आठ दिवसांसाठी ईडी कोठडीत पाठविले आहे.
इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीकडे जवळपास 200 कोटी रुपयांचे कर्ज आहे. शेतकऱ्यांचे करोडो रुपये देणे आहे आणि यामुळेच ईडीने या प्रकरणाला आपल्या हातात घेतले असेल असे सांगण्यात येते. ईडीच्या तपासात, आठ दिवसांच्या कोठडीत अजय बाहेतीकडून जी कांही माहिती प्राप्त होईल त्या आधारावर नांदेडमधील अनेक व्यवसायीक, सरकारी धान्याचा काळाबाजार करणारी मंडळी, सरकारी धान्याची वाहतुक करणारी मंडळी, महसुल प्रशासनाचे अधिकारी या ईडी चौकशीत येतील असे वाटते. दुर्देव हे आहे की, ज्या शेतकऱ्यांचे पैसे इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनी देणे शिल्लक आहे त्यांचे पैसे कधी मिळतील हा प्रश्न असाच काळ्या कुट्ट अंधारात लपलेला दिसतो आहे.
पंचतारांकित कृष्णूरमधील दुसऱ्या अशाच कंपनीची चौकशी होणार काय?
भारताच्या प्रवर्तन निदेशालयाने कृष्णूर गाठलेच आहे. त्यामुळे कृष्णूरच्या पंचतारांकीत वसाहतीत असलेल्या दुसऱ्या एका अशाच कंपनीची चौकशी केली तर त्यातून सुध्दा असंख्य मोठे मासे ईडीच्या हाती लागतील. तो कारभार सुध्दा सार्वजनिक पैशांचाच आहे. सार्वजनिक रक्कमेबाबत होणाऱ्या घोटाळ्यात ईडीला कार्यवाही करण्याचे भरपूर मोठे अधिकार आहेत. त्या कृष्णूर येथील दुसऱ्या कंपनीमध्ये उच्च पदाचे काही पोलीस अधिकारी आणि कनिष्ठ दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भागिदार आहेत असे सांगितले जाते. नाव कोणाचेही असेल पण मुळ भागिदारी ईडीने शोधावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोठे गेले अजय बाहेतीचे मित्र
अजय बाहेती हे खुप मोठे व्यक्तीमत आहे. त्यांच्या आसपास फिरणारी असंख्य संख्येतील मंडळी होती. सन 2018 मध्ये त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला तेंव्हा अनेकांनी गुपचूपपणे, वातानुकुलीत गाड्यांमध्ये फिरून, अनेकांना दुरध्वनीवर बोलून आम्ही तुमचे मित्र आहोत असा देखावा अजय बाहेतीला दाखवला होता. पण जसे-जसे प्रकरण वाढत गेले तसेे-तसे हे सर्व त्यांचे चाहते दुर गेले. आजही आता प्रकरण ईडीच्या ताब्यात आहे. त्यामुळे कोणीही त्यांच्या जवळ जायला तयार नाही. म्हणून अजय बाहेती कोठे आहेत तुमचे मित्र असा प्रश्न विचारावासा वाटतो.
काळा पैसा पांढरा करण्याच्या कारणासाठी अजय बाहेती ईडीच्या कोठडीत;नांदेडच्या इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीचा प्रकार