लोहा तहसील कार्यालयात प्रेत काढतांना गडबड करणाऱ्या लोकांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-तहसील कार्यालय लोहा येथे एका अपंग व्यक्तीने गळफास घेतल्यानंतर त्याचे प्रेत खाली उतरण्यासाठी प्रयत्न सुरू असतांना गोंधळ घालणाऱ्या लोकांविरुध्द लोहा तलहसीलदारांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.3 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास लोहा तहसील कार्यालयात एक प्रेत लटकलेले दिसले. त्यांचे नाव भिमराव चंपती शिरसाट (42) असे होते. त्यांनी आपल्या मानेला दोरीमध्ये अडकवून तहसील कार्यालयाच्या गच्चीवरून स्वत:ला लटकवून घेतले होते. लोहा पोलीसांनी या प्रकरणाची माहिती मयत शिरसाट यांच्या कुटूंबियांना दिली आणि ते आल्यावर प्रेत खाली उतरवून आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. या तयारीला सायंकाळचे 4 वाजले होते. त्यावेळी बाळासाहेब जाधव रा.सुनेगाव, लक्ष्मण मोरे रा.सोनखेड, गजानन मोरे रा.निळा, भिमराव शिंदे रा.हळदप आणि इतर तीन ते चार व्यक्तींने ते प्रेत खाली आणण्याचा प्रयत्न करत असतांना तहसीलदारांसोबत गैरवर्तन केले. त्यानंतर तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केल्यानंतर 7 जुलै रोजी तहसीलदार विठ्ठल माधवराव परळीकर यांनी या बाबत पोलीस ठाणे लोहा येथे तक्रार दिली. लोहा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 128/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 143, 149, 504, 188 आणि 279 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्या तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल कऱ्हे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *