नांदेड(प्रतिनिधी)-29 मार्च रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 114 मध्ये वजिराबाद पोलीसांनी 27 लोकांना पकडलेले आहे. 61 लोकांच्या नावासह एफआयआर दाखल झाला होता आणि त्यानंतर दोषारोपपत्र 84 जणांच्या नावाने दाखल झाले आहे. उर्वरीत मंडळी फरार या सदरात फिरत आहेत. ती मंडळी किंवा त्यांचे नातलग नांदेडच्या कांही पोलीसांसोबत गुप्त बैठका करून यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नरत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांना यश कसे येईल? आणि ते दोन पोलीस या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार आहेत काय? मग कोणाच्या दमावर ते हे सर्व करत आहेत. अशा प्रक्रिया सुध्दा नांदेड जिल्हा पोलीस दलात सुरू आहेत. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
29 मार्च रोजी झालेल्या घटनेनंतर तात्काळ पकडण्यात आलेल्या कांही लोकांना नंतर सोडून देण्यात आले. त्या प्रकरणानंतर राजकीय दबाव तयार झाला. या दबावानंतर पोलीसांनी आपल्या भुमिका शांंततेच्या मार्गात आणल्या. ज्या लोकांना सोडले गेले त्यांच्याकडून मोदकांचा प्रसाद घेतला गेला आणि गुन्ह्याचा तपास सुरू होता. पहिल्याच दिवशी 20 आरोपी न्यायालयात हजर करणाऱ्या पोलीसांनी त्यात हळूहळू कांही आरोपी निष्पन्न केले. हा कौशल्यपुर्ण तपास कोणत्या सक्षम अधिकाऱ्याचा मार्गदर्शनात झाला हे अद्याप गुपीतच आहे. 77 दिवसानंतर एक नवीनच आरोपी या प्रकरणात निष्पन्न करण्यात आला. त्याने तर नंतर मोठ-मोठे आरोप केले. तोही अद्याप पोलीसांना सापडला नाही. त्यासाठी एक सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि एक पोलीस अंमलदार यांच्या गळ्यावर तलवार ठेवण्यात आली. सहाय्यक पोलीस निरिक्षक तर परभणीला पाठवून देण्यात आला आहे आणि पोलीस अंमलदार आपला जीव मुठीत घेवून नांदेडमध्येच जगत आहे. त्यासाठी सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस अंमलदाराचे सीडीआर व एसडीआर मागविण्यात आले आहेत अशी खात्रीलायक माहिती आहे. पण त्या दोघांमुळेच या गुन्ह्याची वाट लागली काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणाकडे नाही.
अत्यंत खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात दोन पोलीसांनी मिळून या गुन्ह्यातील नाव असलेल्या कांही आरेापींच्या कुटूंबियासोबत एक गुप्त बैठक केली. या दोन पोलीसांचे सीडीआर आणि एसडीआर का तपासले जात नाहीत कारण त्यांची नोकरी कोठे आहे, ते कोठे फिरत आहेत, त्यांना तेथे जाण्यासाठी परवानगी दिली होती काय?, गुप्त बैठक घेण्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आहे काय?, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच हे सर्व चालले आहे काय ? या अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप कोणाला सापडली नाहीत असो नांदेड जिल्ह्यात पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांना बदनामीच्या घेऱ्यात आणून स्वत: सुर्याजी पिसाळासारखे वागणाऱ्यांची कमतरता नाही. म्हणून प्रमोद शेवाळे यांनी आता दररोजच्या अत्यंत छोट्याशा घटनेकडे सुध्दा गांभीर्याने पाहण्याची नक्कीच गरज आहे.
गुप्त बैठकीच्या माध्यमातून दोन पोलीस करणार गुन्हा क्रमांक 114 ची निर्गती?