विष्णुपूरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे
नांदेड(प्रतिनिधी)-काल दिवसभरात दोन सत्रांमध्ये पडलेल्या पावसाने नांदेड जिल्हा आणि नांदेड शहर येथील पोकळ गप्पांचा ढिगारा धुवून काढला. अशी जागा शिल्लक राहिली नाही तेथे पाणी साचले नाही. एका ठिकाणी एक बालक वाहुन गेला. अनेक ठिकाणी रस्त्यांचा संपर्क तुटला. आज पहाट निघाली तेंव्हा सर्वत्र स्वच्छ आभाळ दिसत होते. पण कालच्या पाण्याने आणलेली घाण शहरात अनेक ठिकाणी तशीच साचलेली होती. त्यातील दुर्गंधीमुळे आता नवीन साथरोग निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. महानगरपालिका नांदेड आपली कॉलर नेहमीच टाईट दाखवते पण त्यातला फोलपणा पावसाच्या पाण्याने समोर मांडला आहे.

काल दुपारी तास-सव्वातास जोरदार पाऊस पडला. त्यानंतर पुन्हा सायंकाळी सुरू झालेला पाऊस 9 वाजेपर्यंत सुरू होता. पावसाची तिव्रता अत्यंत जोरदार होती. त्यामुळे सखल भागांमध्ये तर तलाव तयार झाले. नांदेड शहरातील कोणत्याही रस्त्यावर पाणीच पाणी दिसत होते. रस्त्यावर पडलेले पाणी नालीद्वारे वाहण्याची कांही एक सोय नव्हती आणि जेथे सोयी होत्या तेथे हे पाणी वाहुन जात नव्हते. कारण पाण्याचा रस्ता अडला होता. शहरातील अनेक ठिकाणी पावसाने साचलेले तळे 3 ते 4 फुट उंच झाले होते. त्यामुळे वजनदार वाहने सुध्दा पाण्यात तरंगतांना दिसू लागली होती. लहान बालकांनी मात्र या परिस्थितीचा आनंद घेत मजा केली. विज वितरण कंपनी मान्सुन पुर्वी करावयाची कामे कधीच करत नाही त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये विद्युत गुल झाली होती. कांही कांही ठिकाणी तर आज 12 जुलैची पहाट झाल्यावर सुध्दा विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे असे म्हणतात आम्ही जेंव्हा निसर्गाला आव्हान देतो तेंव्हा निसर्ग आमची वाट कांही क्षणातच लावून टाकत असतो. आजपर्यंत असे अनेकदा घडले आहे. तरीपण आमच्यात सुधारणा होत नाही हे दुर्देव.
मुखेड शहरात सुध्दा दुकानांमध्ये पाणी घुसले. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क अधिक पावसामुळे तुटला. त्यामुळे भरपूर त्रास झाला पण हा त्रास चार ते सहा तासांमध्ये संपला. कांही ठिकाणी रेल्वे स्थानकावर पाणी साचल्यामुळे रेल्वे थांबल्या होत्या. एकूणच निसर्गाने कांही तासांमध्ये दिलेला पावसाचा लोंडा सांभाळण्याची ताकत प्रशासनाकडे नव्हती. अशा परिस्थितीत माणसांना जीवन जगणे तर आवश्यकच आहे या परिस्थितीवरच कालची रात्र संपवून जनतेने आज 12 जुलै रोजी आपला नवा दिवस सुरू केला आहे. आज 12 जुलै रोजी आकाश निरभ्र दिसत असतांना पुढे काय होईल याचा अंदाज मात्र अवघड आहे.
12 जुलै रोजी सकाळी 7 वाजता विष्णुपूरी धरणाच्या जलाशयाची पातळी 354.95 मिटर झाली आहे. धरण 99.4 टक्के भरले आहे. धरणातून 934 क्युमेक्स पाण्या विसर्ग करण्यासाठी धरणाचा दरवाजा क्रमांक 6 आणि 13 असे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अव्याहत पाऊस पडत असल्यामुळे गोदावरी नदीपात्रातून विष्णुपूरी धरणात येणारा पाण्याचा येवा सुरू आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू राहिल. नांदेडच्या पुढे गोदावरी नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी आता दक्षता घेण्याची गरज आहे. कारण ज्या पध्दतीने पाण्याची आवक असते त्या पध्दतीने पाण्याचा विसर्ग केला जातो. जनतेने नदी काठी, अगदी नदीजवळ घरे असणाऱ्या लोकांनी पावसाळ्यापर्यंत दक्षता कायम घ्यावी अशी अपेक्षा आहे. पावसाने कांही ठिकाणी, कांही वस्त्यांमध्ये, कांही घरांना त्रास दिला असेल तरी जेवढा जास्त विसर्ग विष्णुपूरी धरणातून होईल तेवढा जास्त फायदा वाळू माफियांना होणार आहे. देव त्यांच्यासाठी सुध्दा विचार करत असेल असे आज म्हणायला हरकत नाही.