वजिराबाद पोलीसांनी एक चोरटा पकडला 1 लाख 76 हजार रुपयांचा ऐवज जप्त ; बुधवारपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी एका मोबाईल चोरट्याला पकडून 18 मोबाईल, एक सोन्याची साखळी, कानातील सोन्याचे दोन टॉप्स आणि दोन अंगठ्या असा एकूण 1 लाख 76 हजार 458 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी योगेशकुमार राहगंडाले यांनी या चोरट्याला 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार एक चोरटा नांदेड येथून हैद्राबादकडे जाण्याच्या तयारीत आहे. 10 जुलै रोजी या चोरट्याला वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील प्रमुख पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे, पोलीस अंमलदार दत्ताराम जाधव, विजयकुमार नंदे, गजानन किडे, मनोज परदेशी, चंद्रकांत बिरादार, संतोष बेल्लूरोड, व्यंकट गंगुलवाड, बालाजी कदम, शेख इमरान, शरदचंद्र चावरे यांनी दररोज पहाटे 4 वाजल्यापासून सतत 8 दिवस सापळा लावून 10 जुलै रोजी अटक केले. त्याचे नाव राजू देविदास वाघमारे रा.बळीरामपूर नांदेड असे आहे.
10 जुलै रोजी न्यायालयाने राजू वाघमारेला एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले. त्यानंतर 11 जुलै ते 14 जुलै अशी तीन दिवसांची पोलीस कोठडी मुख्य न्यायदंडाधिकारी योगेशकुमार राहगंडाले यांनी मंजुर केली आहे. पोलीसांनी त्याच्याकडून एकूण 18 मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिणे असा एकूण 1 लाख 76 हजार 458 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. राजू वाघमारेने वजिराबाद येथील दोन आणि  शिवाजीनगर येथील एक असे तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. डॉक्टर्स लाईन शिवाजीनगर येथून दवाखान्यातील मोबाईल राजू वाघमारेनेच चोरलेले आहेत. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, प्रभारी पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी वजिराबाद पोलीसांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *