नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या सासरच्या मंडळीने मारहाण केल्याची जावयाने दिलेली तक्रार आणि त्यानंतर न्यायालयात दाखल झालेला फौजदारी खटला यामध्ये तक्रारदाराला लागलेला मार हा कोणी मारलेला नसल्याचे सिध्द झाल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एल.गायकवाड यांनी या प्रकरणातील सासरा, सासू आणि तक्रारदाराची पत्नी या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.
शेख अब्दुल हक अब्दुल करीम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 फेबु्रवारी 2020 रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास ते आपल्या सासुरवाडीला आसरानगर येथे गेले असतांना त्यांचे सासरे शेख गुलामोद्दीन खाजा मोईनोद्दीन, सासु मुमताज शेख गुलामोद्दीन आणि त्यांची पत्नी तबसुमबेग शेख अब्दुल हक यांनी त्यांना मारहाण केली. चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा बरगडीला मार लागला अशी तक्रार विमानतळ पोलीस ठाण्यात दिल्यानंतर गुन्हा क्रमांक 53/2020 कलम 323, 324, 504,506 सह 34 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार ए.एस.गायकवाड यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयात या प्रकरणी साक्षीपुरावे झाले तेंव्हा तक्रारदार शेख अब्दुल हक याने त्यांच्या बरकडीला लागलेला मार हा चाकुचा नसून तो दरवाज्याने लागला आहे असे सांगितले. यावरून इतर साक्षी पुरावे झालेच नाहीत आणि न्यायालयाने शेख गुलामोद्दीन शाजा मोईनोद्दीन, मुमताज शेख गुलामोद्दीन आणि तक्रारदाराची पत्नी तबसुमबेग अब्दुल हक यांची या खटल्यातुन मुक्तता केली आहे. या खटल्यात आरोपींच्यावतीने ऍड.मोहम्मद मोहियोद्दीन यांनी काम केले.
जावयाला मारहाण करणारा सासरा, सासु आणि त्याची पत्नी निर्दोष