नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर तडीपार, एमपीडीए, एमसीओसीए अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील मार्गदर्शक द्वारकादास भांगे यांनी नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना असे प्रस्ताव कसे तयार करावेत या संबंधाने एका कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या सुचनेप्रमाणे आज एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जिल्ह्यातील समाजाला त्रास देणारे गुन्हेगार शोधून त्यांच्याविरुध्द तडीपार, एमपीडीए, एमसीओसीएचे प्रस्ताव कसे तयार करावेत या संदर्भाने औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील मार्गदर्शक द्वारकादास महादेवराव भांगे यांनी 25 अधिकारी आणि 65 पोलीस अंमलदारांना एका कार्यशाळेत दरम्यान प्रशिक्षण दिले.
नांदेड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांचा आढावा घेण्यात आला असून कोणत्या गुन्हेगारावर कोणता प्रस्ताव योग्य आहे, तो प्रस्ताव कसा तयार करावा, वरिष्ठ न्यायालयाने या बाबत दिलेले मार्गदर्शन कसे अंमलात आणावे याबाबत आजच्या कार्यशाळेत द्वारकादास भांगे यांनी मार्गदर्शन केले. एमपीडीए, एमसीओसीए आणि तडीपार या प्रस्तावांना तयार करतांना काय त्रुटी राहतात आणि त्या त्रुटी प्रस्तावाचा बोजवारा कसा उडवितात याबाबत द्वारकादास भांगे यांनी नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनानंतर आता जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुध्द लवकरच तडीपार, एमपीडीए, एमसीओसीए या कायद्यानुसार लवकरच नवीन प्रस्ताव तयार होतील आणि सर्वसामान्य माणसाला सराईत गुन्हेगारांकडून होणारा त्रास आटोक्यात आणला जाईल असे पोलीस विभागाला वाटते. या कार्यशाळेत अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे, महिला पोलीस अंमलदार शेख शमा गौस यांनी परिश्रम घेतले.