
नांदेड(प्रतिनिधी)- ईद-उल-अजहा (बकरी ईद) साजरी करण्यासाठी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात मुस्लिम समाजातील अनेक व्यक्तींसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी सुद्धा होते.
दि. 21 जुलै रोजी बकरी ईद साजरी होणार आहे. या वर्षीच्या बकरी ईद दिनी कोवीड नियमावलींच्या बंधनात राहून ही ईद साजरी व्हावी या संदर्भाने आज शहरातील मुस्लिम समाजातील अनेक लोकांसोबत पोलीस अधीक्षक कार्यालयात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, गृह पोलीस अधीक्षक विकास तोटावार, इतवाराचे पोलीस उपअधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे, तहसीलदार किरण अंबेकर, मनपाचे प्रभारी उपायुक्त अजितपालसिंघ संधू, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बकरी ईद सणानिमित्ताने येणाऱ्या अडचणी मुस्लिम बांधवांनी प्रशासनासमोर मांडल्या. त्यानंतर प्रशासनाने ईद साजरी करताना महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकान्वये ईद साजरी करावी असे आवाहन केले. जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुस्लिम मौलवी, प्रतिष्ठीत नागरीक, पोलीस मित्र अशा वेगवेगळ्या लोकांसोबत बैठका घेऊन कोवीड-19 अनुषंगाने ईद साजरी करण्याच्या सुचना द्याव्या असे सांगण्यात आले. या बैठकीत शहरातील मुस्लिम बांधव सुद्धा उपस्थित होते.