नांदेड(प्रतिनिधी)-4 थी पर्यंत इंग्रजी शाळेची मान्यता असतांना 8 पर्यंतचे वर्ग चालवून शासनाची, विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या मॉर्डन इंग्लीश स्कुल उमरीच्या मुख्याध्यापिकेविरुध्द एका नगरसेविकेने केलेल्या न्यायालयीन तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे.
उमरी येथील नगरसेविका दिपाली अशोक मामीडवार यांनी उमरी न्यायालयात दिलेल्या तक्रारीनुसार उमरी येथे जागृती बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने मॉर्डन इंग्लीश स्कुलची स्थापना करण्यात आली. या शाळेला फक्त 4 थी वर्गापर्यंत परवानगी असतांना या शाळेत 8 वी इयत्तेपर्यंत वर्ग चालवून शाळेच्या मुख्याध्यापिका तथा संस्थेच्या सचिव अनुराधा संजय कुलकर्णी यांनी सरकार, विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केली आहे अशी तक्रार दाखल केली. न्यायालयाने या तक्रारीवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 156(3) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश उमरी पोलीसांना दिले. उमरी पोलीसंानी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 166/2021 कलम 420, 437, 438, 471 भारतीय दंडसंहितेनुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास उमरीचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे.
परवानगी नसतांना इंग्रजी शाळेत जास्तीचे वर्ग चालविणाऱ्या मुख्याध्यापिकेविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल