नांदेड(प्रतिनिधी)-कोरोना प्रादुर्भावामुळे पोलीस दलातील सर्वच प्रकारचे प्रशिक्षण बंद आहे. त्यासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमीने ई लर्निंग या माध्यमाने सर्वांना प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे. नांदेड जिल्ह्याच्या 75.43 टक्के लोकांनी या ई लर्निंगसाठी आपली नोंदणी केली आहे. ई लर्निंग प्रशिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मे आणि जून या दोन महिन्यात नांदेड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
सध्याच्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या कामाचे स्वरुप बदललेले आहे. या बदलेल्या कामाला आत्मसात करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमीने ऑनलाईन प्रशिक्षणाची सोय ई लर्निंग प्रशिक्षण माध्यमाने केली आहे. नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना महिन्यात किमान तीन तास ई लर्निंग प्रशिक्षण आवश्यक असल्याचे नमुद करून त्यासाठी नोंदणी करण्याच्या सुचना दिल्या.त्यानुसार नांदेड जिल्ह्यात 75.43 टक्के पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी ऑनलाईन ई लर्निंगसाठी नोंदणी केली आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयातून दरमहिन्याला किमान तीन तास ई लर्निंग घ्यावी यासाठी वेळापत्रक तयार केले आहे. हे प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच त्याची नोंद पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या सेवापटात केली जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीचे नोटल अधिकारी वेळावेळी जिल्ह्यातील किती अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी प्रशिक्षण घेतले आहे याची खात्री करतात. त्यानुसार नांदेड जिल्हा मे आणि जून या दोन महिन्यांमध्ये सतत पहिल्या क्रमांकावर आहे.
पोलीसांना दिले जाणारे हे ई लर्निंग सायबर गुन्हे, फॉरेन्सीक कार्यपध्दती, महिला व बाल गुन्हेगारांचा तपास या सारख्या विषयांवर अद्यावत प्रशिक्षण या ई लर्निंग माध्यमात उपलब्ध आहे. ई लर्निंग प्रशिक्षण पोलीस तपास आणि दैनंदिन कार्यपध्दती यामध्ये सुध्दा उपयोगी आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृहपोलीस उपअधिक्षक विकास तोटावार यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण विभागाच्या पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे आणि महिला पोलीस अंमलदार शेख शमा गौस यांनी या प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे.
पोलीसांना दिले जात आहे ई लर्निंग