नांदेड,(प्रतिनिधी)- महिलेला वेळूच्या लाकडाने मारहाण करून तिचे २५ हजारांचे सोन्याचे साहित्य लुटणाऱ्या एक महिला आणि एक पुरुष यांना शिवाजीनगर पोलिसांनी पकडले आहे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.पी.घोले यांनी या दोघांना २४ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
२१ जुलै रोजी सुलोचना रामराव क्षीरसागर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की,त्यांना दोन अनोळखी असलेल्या एक महिला आणि एक पुरुष यांनी तुला वैद्याकडे नेवून इलाज करतो असे सांगून पोलीस ठाणे चुडावा हद्दीत नेले.हा प्रकार २२ जून ते २३ जून दरम्यान घडला आहे. तेथेत्या दोघांनी सुलोचनाला वेळूच्या काठीने मारहाण करून तिच्या कानातील सोन्याच्या काड्या आणि मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांना तपास करण्यास सांगितले. शिवाजीनगर पोलिस अंमलदार संजय मुंढे,रामकिशन मोरे,बालाजी रावळे, रवीकुमार बामणे,दिलीप राठोड,लियाकत शेख,कांबळे, राजकुमार डोंगरे,काकासाहेब जगताप,मधुकर आवतीरक,विशाल अटकोरे यांनी तपासाची चक्रे फिरवत डॉ.आंबेडकरनगर नांदेड मधील राणीबाई भारत कांबळे (५५) आणि चुडावा ता.पूर्णा जी.परभणी येथील लक्ष्मण गणपती बनसोडे (५४) अश्या दोन जणांना पकडले. त्यांनी सुलोचना कडून बळजबरीने हिसकावलेल्या सोन्याच्या साहित्यातील ७ ग्राम वजनाच्या सोन्याच्या कानातील काड्या आणि २ ग्राम वजनाचे मणी मंगळसूत्र काढून दिले आहे.ते पोलिसांनी जप्त केले आहेत.
आज दिनांक २२ जुलै रोजी पोलिसांनी महिलेला लुटणाऱ्या राणीबाई कांबळे लक्ष्मण बनसोडे यांना न्यायालयात हजर केले आणि पोलीस कोठडीची मागणी केली.न्यायाधीश आर.पी.घोले यांनी या दोघांना २४ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
गुन्हा दाखल होताच २४ तासात गुन्हेगार पकडणाऱ्या शिवाजीनगर पोलिसांचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,पोलीस निरीक्षक आनंदा नरुटे यांनी कौतुक केले आहे.