नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख शेख असद यांनी तोंडी आदेशाने तेथे कार्यरत पोलीस निरीक्षक अशोकरावजी घोरबांड यांच्या मार्गदर्शनात 40 किलो गांजा, दोन चारचाकी वाहने आणि रोख रक्कम असा एकूण 12 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शेख असद यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी चंदासिंग कॉर्नर येथे चारचाकी वाहन क्र. एम.एच. 37 टी. 1315 आणि दुसरी गाडी क्र. एम.एच.12 सी.आर. 9154 या दोन गाड्यांची तपासणी केली. यामध्ये अब्दुल रफीक अब्दुल मुबीन, जान महम्मद खान अयुब खान दोघे रा. लालकांरजा जि. वाशिम, शेख मुद्दसीर शेख इसाक रा. नई आबादी शिवाजीनगर, नांदेड आणि शेख उस्मान शेख मेहमुद रा. नंदीपेठ नांदेड हे चार व्यक्ती मिळून आले. दुसऱ्या गाडीत इमरान खान उक्का खान, शेख मोसीन अब्दुल रशीद आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक सर्व रा. कांरजालाड जि. वाशिम असे सात जण मिळाले. या गाड्यांच्या डिकीमध्ये पांढऱ्या रंगाच्या पोत्यात दोन किलो वजनाचे 20 पाकीट अशा वजनाचा 40 किलो गांजा सापडला. या गांजाची किंमत 4 लाख रूपये आहे. तसेच दोन गाड्या आणि या सात लोकांकडे सापडलेले रोख 74 हजार 900 रूपये असा एकूण 12 लाख रूपयांचा ऐवज सापडला आहे.
नांदेड ग्रामीण पोलिसांनी या सात लोकांविरूद्ध गुन्हा क्र. 527/2021 कलम 20(ब)गुंगीकारक औषधी द्रवे आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खैरे यांच्याकडे देण्यात आला आहे. ही सर्व कारवाई पोलीस अंमलदार श्याम नागरगोजे, शिवा पाटील, चंद्रकांत स्वामी, प्रमोद कऱ्हाळे, संतोष जाधव, ज्ञानोबा कवठेकर, विश्वनाथ पवार, शिवानंद कानगुले, नामदेव मोरे यांनी पूर्ण केली.

पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण यांनी पाठविलेल्या प्रेसनोटमध्ये तारीख आज दि. 23/7/2021 अशी लिहिलेली आहे.पण या गाड्या कोणत्या दिवशी, किती वाजता पकडल्या याबाबत काही एक उल्लेख नाही. पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.