राज्य सरकारने पोलीस गणवेशासाठी 70 कोटी 99 लाख 81 हजार 969 रुपये निधी दिला
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी 5 हजार 167 रुपये प्रमाणे एकूण 70 कोटी 99 लाख 81 हजार 969 रुपये असा निधी गणवेश भत्ता म्हणून मंजुर केला आहे.
राज्याचे अपर पोलीस महासंचालक एस.जगन्नाथन यांनी राज्यभरातील पोलीस घटकप्रमुखांना हा गणवेश भत्ता त्वरीत पोलीसांना द्यावा असे आदेश 23 जुलै रोजी निर्गमित केले आहेत.
महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला सन 2014 चा संदर्भ आणि पोलीस महासंचालक कार्यालयातील सन 2020चे ज्ञापन या दोन संदर्भांचा आधार घेवून सन 2021-22 या वर्षासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला 5 हजार 167 रुपये इतका गणवेश भत्ता मंजुर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस महासंचालक यांचे करीता असे लिहुन अपर पोलीस महासंचालक एस.जगन्नाथन यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सन 2021-22 चा गणवेश भत्ता पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ वाटप करावा असे आदेश पारीत केले आहेत.
मागे कांही पोलीस घटकांमध्ये गणवेश खरेदी करण्यासाठी प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याकडून 570 रुपये जमा करून घेण्यात आले. पण तो गणवेश कांही पोलीस कर्मचाऱ्यांना प्राप्त झाला आणि कांही पोलीस कर्मचाऱ्यांना अद्याप प्राप्त झाला नाही. आता राज्य शासनाने 70 कोटी 99 लाख 81 हजार 969 रुपये एवढा भरघोस निधी पोलीस कर्मचाऱ्यांच्या गणवेशांसाठी मंजुर केला आहे. त्या निधीतून प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला 5 हजार 167 रुपये रोख रक्कम त्वरीत देण्याचे आदेश झाले आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी 570 रुपये भरले आणि ज्यांना गणवेश भेटला नाही त्या बाबत काय निर्णय होईल हे गुलदस्त्याच आहे.