नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यासाठी 593 कर्मचाऱ्यांचा दरबार पोलीस मुख्यालयातील आसना विश्रामगृहात भरणार आहे.
कोविड कालखंडातील यंदाच्या आर्थिक वर्षातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या 31 जुलै पर्यंत करायच्या आहेत. त्याअनुशंगाने नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी 593 पोलीस कर्मचाऱ्यांना उद्या दि.24 जुलै रोजी पोलीस मुख्यालयातील आसना विश्रामगृहात बोलावले आहे. यामध्ये सकाळी 9 वाजता सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदाच्या पोलीस अंमलदारांची मुलाखात घेण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता पोलीस हवालदार, दुपारी 1 वाजता पोलीस नाईक आणि दुपारी 3 वाजता पोलीस शिपाई तसेच दुपारी 4 वाजता चालक असलेल्या सर्व पोलीस अंमलदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

याबद्दलची सर्व माहिती संबंधीत ठाणे अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. ज्यांच्या सोबत काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांनी आपला कार्यकाळ त्या ठिकाणी पुर्ण केला आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मागील वेगवेगळ्या प्रसंगी सांगितलेल्या शब्दांनुसार पोलीस अंमलदारांना शक्यतो त्यांच्या पसंतीची ठिकाणे बदली म्हणून दिले जातील. कारण पोलीस अंमलदारांना त्यांची मर्जी नसलेल्या ठिकाणी बदली दिली तर त्याचा परिणाम त्यांच्या कर्तव्यावर होईल आणि ते योग्य रितीने काम करू शकणार नाहीत. पोलीस अंमलदारांनी मागितलेल्या ठिकाणी त्या पदाची जागाच उपलब्ध नसेल तर प्रशासकीय स्तरावर त्यांची बदली केली जाईल. सर्व पोलीस अंमलदारांसमक्ष अत्यंत पारदर्शकपणे ही बदलीची प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे.