नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सुर्याजी पिसाळांनी आपली हद्द नसतांना नांदेड शहरात एका जुगार चालकाला 52 पत्यांचा खेळ मांडण्याची मुभा दिली. त्यामुळे मुळ स्वराज्याच्या मालकाऐवजी सुर्याजी पिसाळांची पोलीस दलात चलती झाल्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी शहर आणि जिल्ह्यात जुगर हा शब्द ऐकायला मिळणार नाही अशी परिस्थिती तयार करण्याचे आदेश आपल्या अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना दिल्यानंतर जिल्हाभरात जुगारावर अनेक छापे टाकण्यात आले. महाराष्ट्र जुगार कायद्या कलम 12 चे अनेक गुन्हे दाखल झाले पण भारतीय कायद्यामध्ये असलेल्या त्रुटींचा फायदा या जुगार चालकांना मिळतो आणि जुगार खेळणारे आणि जुगार खेळविणारे यांना पोलीसांना जामीन द्यावाच लागतो. त्यामुळे तास-दोन तासात पोलीस कार्यवाही संपते आणि जुगार पुन्हा सुरू होतो. 52 पत्याच्या जुगारामध्ये राजा, राणी आणि गुलाम आहे. समाजाच्या ठेवणीत सुध्दा राजा,राणी आणि गुलामांना आप-आपले स्थान आहे. पण गुलाम राजाच्या जागी जाण्याची तयार दाखवतो तेंव्हा मात्र आश्चर्य होत असतो.

असाच एक प्रकार नांदेड शहरात नदीकाठी असलेल्या बिलालनगरमध्ये सुरू आहे. हा भाग नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. या भागात कांही अवैध धंदा चालवायचा असेल तर त्यासाठी नांदेड ग्रामीण पोलीसांची परवानगी सर्वात महत्वपूर्ण आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या उत्तरंडीप्रमाणे त्यांचे वरिष्ठ साहेब मंडळी सर्व नांदेडमध्ये वास्तव्यात आहेत. पण आसना नदीपलिकडे आपली हद्द असणाऱ्या सुर्याजी पिसाळ या संज्ञतील अधिकाऱ्याने नांदेडच्या बिलालनगरमध्ये 52 पत्यांचा जुगार चालविण्याची परवानगी दिली अशी चर्चा 52 पत्यांचे जुगार चालविणारे अनेक जण करत आहेत. बिलालनगर हा भाग पोलीस उपविभाग इतवारा यांच्या हद्दीत येतो. या ठिकाणी डॉ.सिध्देश्र्वर भोरे हे पोलीस उपअधिक्षक आहेत. तरीपण बिलालनगरमध्ये सुरू झालेला 52 पत्यांचा जुगार कसा सुरू झाला हे शोधण्यासाठी एखाद्या विद्यावास्पती पदी प्राप्त विद्वान व्यक्तीची नेमणूक पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केली तरच बहुदा सुर्याजी पिसाळांचे रहस्य सार्वजनिक होईल.