नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी आखाडा बाळापूर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षकांना त्यांच्या हद्दीतील एका जुगार अड्यावर सहाय्यक पोलीस अधिक्षकांची धाड टाकल्यानंतर निलंबित केले आहे. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंगा येथे सुध्दा जुगार सुरु आहे. सोबतच ईसापूर धरणाच्या आसपास सुध्दा जुगार सुरू आहे.
दि.२५ जुलै रोजी मौजे शेवाळा या गावात सहाय्यक पोलीस अधिक्षक यतिश देशमुख यांनी पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात एका जुगार अड्यावर धाड टाकली. तेथून पोलीसांनी ४ लाख ८२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या बाबत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४९/२०२१ दाखल झाला.
दुसर्याच दिवशी २६ जुलै रोजी पोलीस उपमहानिक्षक निसार तांबोळी यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रवि हुंडेकर यांना निलंबित केल्याचे आदेश जारी केले. आपल्या आदेशात पोलीस उपमहानिरिक्षक लिहितात आपल्या कामात निष्काळजीपणा दिसून येतो. ही बाब अत्यंत घृणास्पद आहे. तसेच अशी बाब सहन केल्या जाणार नाही असे शब्द लिहुन रवि हुंडेकर यांना निलंबित केले आहे.

आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंगा त्रिकोणी रस्त्यावर एक मोठा जुगार अड्डा चालतो तसेच इसापूर धरणाच्या आसपास सुध्दा मोठा जुगार अड्डा चालवला जातो. त्या जुगार अड्यांवर धाड पडली नाही. वारंगा हे गाव आखाड्या बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. पण ईसापूर धरण आणि त्याच्या आसपासच्या जागा ह्या जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत.
आपले कर्तव्य विसरून जुगार अड्डा चालकांचे घर भरण्यात रस असलेल्या पोलीस अधिकार्यांनी रवि हुंडेकर यांचे निलंबन एक धडा म्हणून समजावे. नाही तर उद्या कोणत्याही अवैध धंद्याला पाठबळ न देण्याची तयारी असलेले पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी इतरांनाही क्षमा करणार नाहीत. ही बाब नांदेड पोलीस परिक्षेत्रातील हिंगोलीसह नांदेड, लातूर, आणि परभणी या जिल्ह्यातील पोलीस अधिकार्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.