नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात गौण खनिजाची सद्या मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे, रात्री-बेरात्री अवैध वाहतूक होत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होवून अपघाताच्या घटना वाढत आहेत, वाढते अपघात टाळण्यासाठी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या सर्व वाहन चालक व मालकांनी सात दिवसात मान्यताप्राप्त ‘जीपीएस’ यंत्रणा बसवून घ्यावी, असे आवाहन नांदेड येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात सद्या गौण खनिजाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय, नांदेड जिल्ह्यात रात्री-बेरात्रीही गौण खनिजांची ‘अवैध’ वाहतूक होत असल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होवून अपघाताच्या असंख्य घटना घडत आहेत. शिवाय, नांदेड जिल्ह्यात प्रामुख्याने नांदेड शहरात ट्रक, टिप्पर, हायवा आदी वाहनधारकांनी गौण खनिजांच्या वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक होते. मात्र, उपरोल्लेखित वाहनांच्या चालकांकडून उपरोल्लेखित वाहतुकीचे नियमन होत नसल्यामुळे नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १३३ अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यातील गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी ‘जीपीएस’ यंत्रणा बसविण्याचे आदेश जारी केले आहेत.
एकूणच, उपरोक्त आदेशाआधारे नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या ट्रक, टिप्पर तसेच हायवा आदी सर्व प्रकारच्या वाहनचालक आणि वाहनमालकांनी सात दिवसात मान्यताप्राप्त ‘जीपीएस’ यंत्रणा बसवून घ्यावी. अन्यथा ‘जीपीएस’ यंत्रणा न बसविलेल्या ट्रक, टिप्पर तसेच हायवा आदी वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याचीही सर्व संबंधित वाहनचालक तथा वाहनमालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही ‘आरटीओ’ तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांनी जीपीएस यंत्रणा बसवून घ्यावी-प्रादेशिक परिवहन अधिकारी कामत