नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने विक्की ठाकूर खून प्रकरणात 8 मारेकऱ्यांना जेरबंद केल्यानंतर एक वर्षापुर्वी विक्की ठाकूरचा मित्र विक्की चव्हाणच्या झालेल्या खून प्रकरणाला पुन्हा एकदा नवीन कलाटणी मिळाली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीसांनी न्यायालयात हजर केलेल्या दोन जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एल.गायकवाड यांनी सहा दिवस, अर्थात 4 ऑगस्ट 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने विक्की ठाकूर खून प्रकरणातले आरोपी शोधतांना एकूण 8 जणांना अटक केली. त्यात दोन नावे तानाजी उर्फ ताना शंकर चव्हाण (26), सोमेश सुरेश कत्ते (22) या दोघांना विक्की चव्हाण खून प्रकरणात विमानतळ पोलीसांनी अटक केली आहे. विक्की चव्हाणचा खून 2 ऑगस्ट 2020 रोजी डॉ.शंकरराव चव्हाण चौक सांगवी येथे झाला होता. मारेकऱ्यांनी त्याचे प्रेत चार चाकी गाडीत टाकून सर्व नांदेड शहर फिरवून हस्सापूर येथे फेकून दिले होते. त्या दिवशी विक्की चव्हाण सोबत दोन व्यक्ती होते. तो दुचाकीवर जात असतांना त्याला गोळी मारून खून करण्यात आला आणि त्याच्या मृत शरिरावर तिक्ष्ण हत्यारांनी अनेक वार करण्यात आले होते. मयत विक्की चव्हाणच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरुन त्यावेळी गुन्हा क्रमांक 252/2020 दाखल झाला होता.
या प्रकरणात सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेनेच पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात जवळपास 14 जण पकडले होते. त्यात प्रमुख नावे कैलास जगदीश बिघानीया, प्रदीप उर्फ बंटी सोहनलाल राऊत्रे, साईनाथ उर्फ चिंग्या संतोष तरटे, विकास सुभाष हटकर, दिलीप पुंडलिकराव डाखोरे, राम सदाशिव जाधव, दिनेश बालाजी परसे, सुदाम उर्फ भुऱ्या दिनाजी जोंधळे अशी आहेत. या प्रकरणात विधीसंघर्ष ग्रस्त बालक सुध्दा पकडण्यात आला होता. तो आज पुन्हा एकदा विक्की ठाकूर खून प्रकरणात सुध्दा मारेकरी आहे. विक्की चव्हाण खून प्रकरणात आज दोषारोप पत्र दाखल झाले आहे. त्यावेळी झालेल्या चौकशीमध्ये तानाजी चव्हाण आणि सोमेश कत्ते या दोघांचे नाव का आले नाही यावरून त्या काळी तपासामध्ये त्रुटी राहिलच की ठेवण्यात आली हे आज शोधण्याची गरज आहे. विक्की ठाकूरच्या खूनानंतर विक्की चव्हाणच्या खून प्रकरणात आता नवीन कलाटणी आली असून त्यात दोन जणांना अटक झाली आहे.

पकडलेल्या तानाजी उर्फ ताना शंकर चव्हाण, सोमेश सुरेश कत्ते या दोघांना विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, पोलीस अंमलदार बाबा गजभारे, चंद्रकांत पांचाळ, दत्तात्रय गंगावरे,संभाजी पावडे,दारासिंग राठोड, रामदास सुर्यवंशी यांनी न्यायालयात हजर केले असता पोलीस तपासाला योग्य दिशा मिळावी म्हणून पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकीलांनी केली.ती विनंती मान्य करत न्या.एन.एल.गायकवाड यांनी तानाजी चव्हाण आणि सोमेश कत्ते यांना सहा दिवस, 4 ऑगस्ट 2021 पोलीस कोठडीत पाठविले आहे.