नांदेड(प्रतिनिधी)-भुखंडातून श्रीखंड खाण्याची सवय बहुतांश लोकांना लागल्यामुळे मोठी संपत्ती कमावण्याचे स्वप्न पडू लागले. देगलूर नाका परिसरात अनाधिकृत भुखंड विक्री करणाऱ्या 12 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन महिला आहेत, कांही मोठे व्यापारी आहेत. कांही माजी नेते आहेत.
इतवारा क्षेत्रीय विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रावण तुकाराम सोनसळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इतवारा भागातील देगलूर नाका येथील शासकीय रुग्णालय ते उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गट क्रमांक 156/1 चे मालक व कब्जेदार जैतुनबी मोहम्मद ईसूफ, आतिया सुलताना मोहम्मद ईसूफ, मुमताज बेग सलीम खान, मोहम्मद शाहेद मोहम्मद ईसूफ अज्ञान पालक आई जैतूनबी व आतीया सूलताना, मोहम्मद शाबाद मोहम्मद ईसूफ अज्ञान पालक आई जैतूनबी व आतीया सूलताना यांनी या गट क्रमांकात भुखंड विकास करण्यासाठी नगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतली नाही आणि अनाधिकृत भुखंड विकास करीत आहेत. या जागेवर भुखंड विक्रीचा धंदा सुरू झाला आहे. त्यात अक्षय दिनेश प्रमचंदानी, इंदरजित मुरलीधर प्रेमचंदानी, आसिफ रमेशचंद्र शहा, अब्दुल मुकीद अब्दुल गफार, अब्दुल गफार चावलवाला, अब्दुल खय्युम अब्दुल गफार, शेख सोहेल अहेमद मोहम्मद अख्तर यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. महानगरपालिकेत अनाधिकृत भुखंड विकासावर कार्यवाही करण्यासाठी पदनिर्देशीत अधिकारी म्हणून रावण सोनसळे यांची नियुक्ती आहे. या आधारावरच त्यांनी ही तक्रार दिली आहे.
ईतवारा पोलीसांनी 28 जुलै रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नगर रचना अधिनियम 1966 च्या कलम 53(8) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनाधिकृतपणे भुखंडांची विक्री करून त्यातील श्रीखंड खाणाऱ्या लोकांवर एवढीच कार्यवाही करून जमणार नाही तर त्यासाठी शहरात सर्वत्र बारकाईने तपास व्हावा आणि भुखंडांचे श्रीखंड खाणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भुखंडांचे श्रीखंड खाणाऱ्या दोन प्रेमचंदानींसह, तीन महिला असा एकूण 12 लोकांविरुध्द गुन्हा दाखल