नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत आज मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात चक्क गावठी कट्टा अडकला. काही वेळासाठी तर मासे पकडणाऱ्याच्या अंगाला घाम सुटला. पण वजिराबाद पोलिसांनी लगेच त्याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काल दिनांक २९ जुलै रोजी रात्री कालीदास सुदाम खिल्लारे या मासे पकडणाऱ्याने आपले जाळे गोदावरी नदीत गोवर्धन घाट पूल खाली टाकले.आज दिनांक ३० जुलैच्या सकाळी खिल्लारे यांनी आपले रात्री टाकलेले जाळे नदी बाहेर काढले तेव्हा त्यात अडकलेले गावठी पिस्तूल पाहून त्यास घाम फुटला.त्याने लगेच हा प्रकार वजिराबाद पोलिसांना कळवला.
पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक प्रवीण आगलावे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार नदीकाठी गेले.मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकलेले पिस्तूल गावठी काढले.प्रवीण आगलावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपी ज्याने हे गावठी पिस्तूल पाण्यात टाकले त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० जुलै रोजी नांदेडमध्ये झालेल्या खुना नंतर मारेकरी कसे पळाले आणि पळतांना त्यांनी आपल्या हातातील हा गावठी कट्टा तेथे नदीत फेकला होता काय ? हा एक नवीन प्रश्न समोर आला आहे.