गॅंगवारची भिती नांदेड तुरूंगात सुध्दा 

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड कारागृह अधिक्षकांना कारागृहात ‘गॅंगवार’ होण्याची भिती वाटत असल्याचे त्यांनी पोलीस अधिक्षक नांदेड यांना पाठविलेल्या पत्रावरुन स्पष्ट होते. याबाबत वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.
नांदेड जिल्हा कारागृह वर्ग-2 चे अधिक्षक सुभाष सोनवणे यांनी पोलीस अधिक्षक नांदेड यांना पाठवलेले पत्र क्रमांक 1555/2021 नुसार नांदेड जिल्हा कारागृह परिसरात मोबाईल व्हॅनची गस्त वाढविण्याचा विषय लिहिला आहे. या पत्रात पुढे असे लिहिले आहे की, 20 जुलै रोजी कुख्यात गुन्हेगार विक्की ठाकूर याची काही मारेकऱ्यांनी हत्या केल्या असल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. नांदेडच्या कारागृहामध्ये हल्ल्यात मयत झालेल्या विक्की ठाकूरचा भाऊ लखन ठाकूर बंदीस्त आहे. सोबतच त्याच्या विरोधी गट सुध्दा कारागृहात बंदीस्त आहे. त्यामुळे विक्की ठाकूरचा खून झाल्याने तुरूंगात सुध्दा दोन गटात चकमक घडू शकते आणि कारागृहाबाहेरुन देखील हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कारागृह परिसरात मोबाईल व्हॅनची गस्त वाढविणे आवश्यक आहे. या पत्राची एक प्रत पोलीस निरिक्षक वजिराबाद यांना सुध्दा पाठविण्यात आली आहे. त्यावर वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी गांभीर्याने दखल घेतली असून आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जेल परिसरावर लक्ष ठेवण्याचे  आदेश दिले आहेत.
नांदेडमध्ये सुरू असलेल्या ‘गॅंगवार’ला पुर्ण विराम लावण्याची गरज आहे असे लिखाण आम्ही वारंवार मांडले आहे. ‘गॅंगवार’ चकमकीत कांही दुर्घटना घडली तर त्याचा परिणाम समाजावर सुध्दा होवू शकतो. गॅंगवारमध्ये या एका गटाने अत्यंत कमी वयाची बालके आपल्यासोबत घेवून गॅंगमधील मारहाणीचे प्रकार घडविले आहेत आणि अशा प्रकारांमुळे ज्या बालकांचे भविष्य उमेदीच्या मार्गावर असावे ते गुन्हेगारीच्या खाईत लोटले जात आहेत. कांही पोलीस अधिकारी या गॅंगवारला संपविण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत आहेत. देवाच्या कृपेने त्यातील कोणी विनोद दिघोरे होवू नये अशी अपेक्षा आहे. फक्त पोलीसच नव्हे तर समाजाने सुध्दा यात पुढाकार घेवून आज गुन्हेगारी जगात छोटे-छोटे दिसणाऱ्या बालकांसाठी काम करण्याची गरज आहे. कारण ते सर्व सुध्दा आपल्यातीलच एक आहेत. म्हणून गुन्हेगारी जगतात शेवटी काय मिळते हे याच गॅंगवारच्या संबंधाने या बालकांसमोर ठेवायला हवे. या बालकांना तुझ्या घरच्या मंडळीसोबत चुकीचे घडले, त्याचा बदला घेण्याची हुल देवून एका गटाने या बालकांना गुन्हेगारी जगतात पाय ठेवायला शिकवले. त्यांनी केलेल्या एखाद्या चुकीच्या घटनेनंतर त्यांच्या मनात मी ‘डॉन’ होणार अशी मानसिकता तयार झाली आणि त्यातूनच आज नांदेडमध्ये सुरू असलेला गॅंगवार समोर आला. अशा गॅंगवारबद्दल फक्त वर वर विचार न करता जास्तीत जास्त खोलात जावून याचा विचार होणे आवश्यक आहे. आम्ही तर फक्त शब्दात समाजाचे दु:ख मांडू शकतो पण त्यावर कार्यवाही करण्याचा अधिकार फक्त प्रशासनाला आहे. विशेष करून पोलीस विभागाला आहे. तेंव्हा त्यांनी या बाबत बारकाईने, दक्षतेने कार्यवाही करण्याची गरज आहे. जेणे करून आज गॅंगवारमध्ये नामांकित झालेले गुन्हेगार जास्तीत जास्त दिवस तुरूंगात राहिले पाहिजे आणि त्यांच्या पासून समाजाला कांही त्रास नाही झाला पाहिजे.पोलिसांनी आपलीच जबाबदारी आहे हे आपल्या मनावर बिंबवले तर काही सुद्धा अशक्य नाही.अनेक वर्षणापासून प्रसिद्ध असलेली म्हण,’पोलीस खाते करील तेच होईल’ आज सिद्ध करून दाखवण्याची वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *