नांदेड(प्रतिनिधी)-1 ऑगस्ट रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीदरम्यान नांदेड जिल्ह्यात 4190 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली त्यात विविध प्रकरणांमध्ये 26 कोटी 39 लाख 35 हजार 147 रुपये तडजोडीच्या स्वरुपात वसुल झाले अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडचे सचिव आर.एस.रोटे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरण सेवा यांनी दिलेल्या आदेशानंतर नांदेडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.एल.आणेकर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश के.एन.गौतम यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, पॅन प्रमुख न्यायाधीश, वकील सदस्य, पॅनल सदस्य आणि अनेक विधीज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली कशी काढता येतील यासाठी प्रयत्न केले. कौटूंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे सुध्दा प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न झाले.
जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये मिळून 4190 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. 26,39,35,147 रुपये एवढी मोठी रक्कम विविध प्रकरणांमध्ये तडजोडीतून पक्षकारांना मिळणार आहे. यामध्ये दिवाणी, फौजदारी, एनआय ऍक्ट (परक्राम्य संकीर्ण अभिलेख), बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भुसंपादन, ग्राम पंचायतीतील घर पट्टी आणि पाणी पट्टीची प्रकरणे, विद्युत प्रकरणे, टेलीफोल आणि मोबाईल प्रकरणे यामध्ये दाखलपुर्व 1242 प्रकरणे निकाली काढण्यात आले.
जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष जिल्हा सरकारी वकील, भुसंपादन अधिकारी, विमा कंपन्या, महानगरपालिका, महसुल विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, न्यायालयीन व्यवस्थापक, प्रबंधक आणि कर्मचाऱ्यांनी विधी सेवा प्राधिकरणचे लोक न्यायालया यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
न्यायाधीश के.एन.गौतम, न्या.एस.एस.खरात, न्या.आर.एस. रोटे यांनी जिल्हा भरात सुरू असलेल्या लोक न्यायालयातील कार्यक्रमांवर बारकाईने लक्ष ठेवून मेहनत घेतली. विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर.एस.रोटे यांनी उपस्थित असलेले सर्व पक्षकार, न्यायाधीश, विधीज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी, विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी, आदींनी लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष केलेल्या सहकार्याचे आभार व्यक्त केले आहे आणि भविष्यातील कार्यक्रमांमध्ये असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
1 ऑगस्टच्या लोकन्यायालयात 26 कोटी 39 लाख 35 हजार 147 रुपये तडजोडीने प्राप्त; 4 हजार 190 प्रकरणांचा निकाल