नांदेड(प्रतिनिधी)- मालेगाव रस्त्यावर एका माणसाला मारहाण करून त्याची लुट करणाऱ्या दोन जणांना भाग्यनगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आश्रुबा घाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग करून पकडले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी–जी.सी.फुलझळके यांनी या दोघांना 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार दि.2 ऑगस्ट रोजी भाग्यनगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आश्रुबा घाटे, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार ओमप्रकाश कवडे, बाबर आदी रात्रीची गस्त करत असतांना मध्यरात्री 11.30 वाजेच्यासुमारास भावसारनगर पाटी, बर्डे हॉस्पीटल जवळ मालेगाव रोड येथे एका माणसाला तीन माणसे मारहाण करत असल्याचे दिसले. पोलीसांनी लगेच मारहाण करणाऱ्यांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा ते तिघेही पळाले. पोलीसंानी जवळपास 1 किलो मिटर पाठलाग करून त्यातील दोघांना पकडले. त्यांची नावे अजिंक्य उर्फ सोनु विश्र्वनाथ कावळे(38)रा.तथागत नगर तरोडा(खुर्द), नितीन उत्तमराव ढोले (20) रा.परवानानगर अशी आहेत. त्यांनी मारहाण करून केलेल्या लुटीतील रोख 700 रुपये आणि धार-धार खंजीर जप्त केले आहे.
पुंजाजी शिदाजी अमोलकर रा.तथागतनगर यांच्या तक्रारीवरुन तिघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 34 आणि भारतीय हत्यार कायद्या कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 255/2021 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विजयकुमार कांबळे हे करीत आहेत.
पकडलेल्या नितीन ढोले आणि अजिंक्य कावळेला आज 3 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.सी.फुलझळके यांनी या दोघांना 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांनी पाठलाग करून दोन दरोडेखोरांना पकडल्यासाठी दाखवलेल्या हिंमतेचे कौतुक केले आहे.
मालेगाव रस्त्यावर पोलीसांनी दरोडेखोरांना पाठलाग करून पकडले ;5 ऑगस्ट पर्यंत दोघांना पोलीस कोठडी