नांदेड(प्रतिनिधी)-31 जुलैला रात्री बायो डिझेलच्या अवैध विक्रीच्या ठिकाणी महसुल विभागाने छापा टाकल्यानंतर त्याची तक्रार द्यायला महसुल विभागाला तीन दिवस लागले. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
दि.31 जुलै शनिवारी बायो डिझेलचा बेकायदेशीर व्यवसाय करण्याच्या ठिकाणी नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर, विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, दिपक मरळे, पोलीस उपनिरिक्षक ठाकूर आदींनी सांगवी भागातील किसननगर येथे गट क्रमांक 215 या ठिकाणी सुरू असलेल्या पेट्रोकेमिकल्स लब्यु्रकेटस् या दुकानावर छापा टाकला. या ठिकाणी बायो डिझेल विक्री करण्यात येत होते. त्या ठिकाणहून बायो डिझल, कांही टाक्या, कांही मोजमाप करणारे डबे, एक चार चाकी वाहन असा 55 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. बायो डिझेल विक्री ही कांही विशेष जागी विक्री करण्याची परवानगी आहे. पण ट्रक चालक हे डिझेल कमी दरात मिळते म्हणून ते आपल्या ट्रकमध्ये भरतात. त्यामुळे बायोडिझेलच्या मुळ किंमतीपेक्षा जास्त किंमतीत ट्रक चालक खरेदी करतात म्हणून बायोडिझेलला महत्वप्राप्त झाले. मागील आठवड्यात सर्व डिझेल पंपचालकांनी बायोडिझेलच्या अवैध विक्री बाबत एक निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना दिले होते. दुसऱ्या आठवड्यात यावर कार्यवाही झाली. नायब तहसीलदार दिपक मरळेच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महसुल विभागाने ते अवैध बायोडिझेल विक्री करणारे दुकान सिल केले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक काकडे हे करीत आहेत.
तक्रार द्यायला उशीर का?
31 जुलैला रात्री धाड टाकून बायोडिझेल बाबतची तक्रार देण्यासाठी महसुल विभागाला 3 ऑगस्ट उजाडला. या तक्रारीमध्ये उशीर का झाला हे लिहिले आहे की, नाही याची माहिती प्राप्त झाली नाही. कायद्याची शिकवण सर्वांना देणाऱ्या महसुल विभागाला उशीरा दिलेली तक्रार सिध्द करण्यास अवघड झाले हे माहिती नसेल असे म्हणता येणार नाही. या डिझेल प्रकरणांमध्ये मुळ विक्रेता कोण आहे. या बाबतचा कांही उल्लेख या तक्रारीमध्ये आहे की, नाही हे समजले नाही.
महसुल विभागाने अवैध बायोडिझेल विक्रेत्याविरुध्द तीन दिवसानंतर दिली तक्रार