नांदेड(प्रतिनिधी)-20 लाखांचे किटक नाशक औषध चोरून विक्री करणाऱ्या तिघांकडून पोलीसांनी जवळपास 12 लाखांपेक्षा जास्तचा ऐवज जप्त केला आहे. आज या तिघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.
दि.1 ऑगस्ट रोजी सचिन सिड्स कंपनीचे मालक सचिन उर्फ राजू शिवप्रसाद तोष्णीवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या दुकानातून 1 ऑगस्ट 2021 च्यापुर्वी कधी तरी त्यांच्या दुकानात काम करणारे माधव रामराव सावंत (28) आणि संतोष राधेशाम रावणवेणी यांनी त्यांच्या दुकानातून 20 लाख 3 हजार रुपयांचे शेती उपयोगी असलेले किटक नाशक औषध चोरले आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांनी केला.
या प्रकरणी संतोष रावणवेणी आणि माधव सावंत या दोघांना न्यायालयाने दोन ते 6 ऑगस्ट पोलीस कोठडी दिली. तपासादरम्यान सचिन तोष्णीवाल यांनी दिलेल्या पुरवणी जबाबानुसार या गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल 32 लाख 61 हजार रुपयांचा झाला. या दरम्यान पोलीसांनी गोविंदनगर येथील अंकुश हरीभाऊ सुर्यतळ (27) यास अटक केली. अटकेदरम्यान पोलीसांनी या लोकांकडून चोरलेल्या किटक नाशकांपैकी 12 लाख 17 हजार 29 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 6 ऑगस्ट रोजी या तिघांची पोलीस कोठडी 9 ऑगस्टपर्यंत वाढली. आज न्यायाधीश आर.पी.घोले यांनी या तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
किटक नाशक औषधी चोरी प्रकरणात स्थागुशाने 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला