नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस अधिक्षक हे जिल्ह्याचे प्रमुख असतात. कोणत्याही जिल्ह्यात पोलीस अधिक्षकांचे कार्यालय हे सर्वात मोठे कार्यालय मानले जाते पण नांदेड जिल्ह्यात पोलीस अधिक्षकांपेक्षा मोठे कार्यालय हे भावसार चौकात आहे अशी एक चर्चा पोलीस दलातून ऐकावयास मिळते.
कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधिक्षक हे पोलीस दलाचे सर्वात मोठे अधिकारी असतात. त्यांचे कार्यालय अर्थात पोलीस अधिक्षक कार्यालय हे सर्वात मोठे कार्यालय मानले जाते. पण नांदेडमध्ये एक खळबळ जनक माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयापेक्षा मोठे कार्यालय भावसार चौकाच्या आसपास असलेल्या कोणत्या तरी नगरामध्ये आहे. त्या नगराचे नाव हैरंभ या भगवंताच्या नावावर आहे असे सांगण्यात आले.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेडच्या नदीपलिकडील पोलीस ठाण्यात कांही घटनाक्रम झाला तर त्यातील तक्रारदार आणि आरोपी यांना तेथून 15 किलो मिटर दुर असलेल्या भावसार चौकात नेले जाते आणि त्या ठिकाणी या तक्रारीचे आणि आरोपींचे काय करायचे याचा निर्णय होतो म्हणे. अत्यंत छान प्रकार आहे हा. एकीकडे पोलीस आपल्याला असलेल्या जास्तीच्या कामामुळे ताण येतो असे सांगतात. पण दिवसातून 4 घटनांसाठी भावसार चौकाच्या जवळ जावे लागले तर तो प्रवास 240 किलो मिटर होतो. मग पोलीसांना यासाठी ताण येत नाही काय? हा प्रश्न समोर आला आहे. किंबहुना या पोलीस ठाण्यातील पोलीस बहुदा “शक्तीमान’ असतील किंवा त्यांचा साहेब “सुपरमॅन’ असेल म्हणून या ठाण्यातील पोलीस आपल्या जास्तीच्या कामाला ताण समजत नसतील. कारण असेही सांगितले जाते की, जो रिस्क मोठी घेतो त्याचा फायदा सुध्दा मोठाच असतो.
एकूणच या चाललेल्या प्रकाराकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष का नाही या बद्दल मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कनिष्ठांना होणाऱ्या जास्तीच्या ताणाला सुध्दा कमी करणे ही वरिष्ठांचीच जबाबदारी आहे.
पोलीस अधिक्षक कार्यालयापेक्षा मोठे पोलीस कार्यालय भावसार चौकात आहे म्हणे..!