नांदेड(प्रतिनिधी)-सध्याच्या परिस्थितीत डेंग्यु आजाराचा फेलव होवू नये म्हणून सर्व नागरीकांनी दक्षता घ्यावी असे प्रसिध्दी पत्रक महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी पाठवले आहे.
महानगरपालिकेच्यावतीने नागरी हिवताप योजनेअंतर्गत तीन पथकाद्वारे प्रभागनिहाय, दैनंदिन, अळीनाशक औषधी फवारणीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दिर्घकाळ साचलेल्या पाण्यामध्ये नियमितपणे गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. महानगरपालिकेचे पथक दररोज खाजगी रुग्णालयांना भेटी देवून डेंग्यु दुषीत, हिवताप दुषीत रुग्णांची माहिती घेत आहेत. त्यांचे रक्ताचे नमुने फेर तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येत आहेत. डेंग्यु दुषीत रुग्णांच्या घरी व परिसरात आळीपाळीने अळीनाशक औषध फवारणी, कंटेनर तपासणी, धुर फवारणी असे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन गृहभेटी देवून ताप रुग्ण सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.
प्रत्येक नागरीकाने आपल्या घरात कोरडा दिवस पाळावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वयंसेवकामार्फत 50 हजार 500 घरांना भेटी दिल्या असता त्यामध्ये 2589 घरांमधील कंटेनर दृषीत आढळे आहे. त्यामुळे ते नष्ट करण्यात आले आहे. जनतेने डेंग्यु आजाराच्या संदर्भाने काळजी घेवून आपल्या घरांमध्ये कोरडा दिवस पाळावा असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.