नांदेड(प्रतिनिधी)-देशात कोविड तपासणीसाठी काम करणारी प्रयोगशाळा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानेच उभारली. म्हणूनच समाज उपयोगी काम करणारे व्यक्ती मोठे असतात असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
आज विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेतील आणि विद्यापीठाच्या कोरोना तपासणी प्रयोगशाळेत काम करणाऱ्या कोरोना योध्दांचा सन्मान करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ.उध्दव भोसले, प्र.कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, आ.मोहन हंबर्डे, आ.बालाजी कल्याणकर, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आणि कोरोना तपासणी प्रयोग शाळेत काम करणारे अमोल सरोदे, काजल भोसले, अमृता कुलकर्णी, उषा यशवंते आणि अजिजा फातीमा यांचा उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राज्यातील उध्दव आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील उध्दव म्हणजे उध्दव या नावातील शक्तीच मोठी असते की काय हे सांगतांना स्वारातीम विद्यापीठाच्या कोविड प्रयोगशाळेने 1 लाख 90 हजार तपासण्या केल्याचे सांगितले. नांदेडने कोविड तपासणीमध्ये केलेल्या कामाचा आदर्श देशाने नव्हे तर जगाने घेण्यासारखा असल्याचे उदय सामंत म्हणाले. एनएसएसप्रमाणे स्वारातीम विद्यापीठाने पुढे एनसीसीचे पथक जास्तीत जास्त ठिकाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगित सुरू करण्याबाबत बोलतांना ना.उदय सामंत म्हणाले उच्च व तंत्र विभागात 42 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील 60 टक्के विद्यार्थी उपस्थिती गृहीत धरली तर जवळपास 32 लाख विद्यार्थी दररोज राष्ट्रगिताचे गाण करतात. मातृभाषा विद्यापीठात टिकली पाहिजे यासाठी मी केलेेले प्रयत्न महत्वपूर्ण आहेत असे उदय सामंत यांनी सांगितले. जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक प्रसंगी दिनी शिवस्वराज्य दिन साजरा होणार आहे. यासाठी कोणता निधी लागला नाही. फक्त शासन निर्णय तयार करावे लागले. प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्रीय भावना आणि महापुरूषांचे प्रेम कायम व्हावे यासाठी हे प्रयत्न केले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.पृथ्वीराज तौर यांनी केले तर आभार प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांनी मानले.
ना.उदय सामंत यांचा पत्रकारांशी संवाद


श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात 1 कोटी 10 लाखांची एक नवीन प्रयोगशाळा लवकरच कार्यान्वीत होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोबतच प्रत्येक जिल्हास्तरावर एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा सन्मान आता घडविला जाईल आणि त्यातून राज्यस्तरावर एका विद्यार्थ्याचा सन्मान होईल असे उदय सामंत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेपुर्वी विजय जोशी यांनी कोरोना काळात पत्रकारांचे झालेले मृत्यू, पत्रकारांना शासनाने मदत करावी आणि पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर घोषित करावे अशी मागणी ना.उदय सामंत यांच्या समक्ष मांडली. पत्रकारांनी या प्रसंगी ना. उदय सामंत यांचा सन्मान केला.