ओबीसीची जनगणना विकासाची गुरूकिल्ली
नांदेड(प्रतिनिधी)-आजच्या भारतात बोटावर शाई तेवढीच लोकशाही शिल्लक राहिली आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टीचे ओबीसी विभाग उपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड यांनी केले.
आज दि.13 ऑगस्ट रोजी ओबीसीची समाजाच्या आरक्षणाबद्दल आणि जनगणनेबद्दल बोलण्यासाठी पत्रकारांसमक्ष रामचंद्र येईलवाड बोलत होते. या प्रसंगी लक्ष्मणराव क्षीरसागर, ज्ञानोबा घुगे, माधव नलावरे, शेख रहेमान आणि गजानन घुगे यांची उपस्थिती होती.
भारतातील आजच्या लोकशाहीच्या परिस्थितीचे वर्णन करतांना रामचंद्र येईलवाड यांनी बोटावर शाई तेवढीच लोकशाही अशा शब्दात लोकशाहीची विडंबना केली. लोकांनी फक्त निवडूण द्यायचे असते. बाकी सर्व राजकीय पक्षाचे हाय कमांड ठरवतात. हे सांगतांना हा प्रकार सर्वच राजकीय पक्षांमध्ये असतो असे रामचंद्र येईलवाड यांनी सांगितले.
आज दोन लोकच देश चालवत आहेत हे सांगतांना येईलवाड यांनी भारताच्या स्वातंत्र्याची चिरफाड करतांना 1947 मध्ये इंग्रजांनी पावर ऑफ ट्रान्सफरचा करार केला होता आणि देश चालवायला दिला होता असा गुप्त करार असल्याचे सांगितले. आजही लोकसभेत दोन अँग्लो इंडियन खासदार असतात. ते दोन खासदार इंग्रजांना आजही सर्व माहिती देतात असे सांगितले. मोदी आणि अमित शहाच्या काळात पेट्रोल, गोडतेल दर दुप्पट झाल्याचा उल्लेख करून हा सर्व घटनाक्रम सात वर्षांमध्ये झाला असल्याचे सांगितले.
ओबीसी जनगणणा ही गुरूकिल्ली आहे. ओबीसी जनगणना झाल्याशिवाय विकास शक्य नाही हे सांगतांना त्यांनी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला विनंती करून आवाहन केले आहे. की, ओबीसी जनगणनेचा ठराव प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने घ्यावा आणि तो ठराव भारताचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठवावा असे आवाहन केले. ओबीसींना मिळणारे आरक्षण हे 27 टक्के फिरते आरक्षण होते ते सुध्दा आता बंद करण्यात आले आहे. ओबीसीची जनगणना झाली तर तो आकडा 52 टक्के होईल हे सांगतांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसह ओबीसी हा आकडा मोजला तर तो 80 टक्के होतो असे रामचंद्र येईलवाड यांनी सांगितले.
भारताच्या ज्या ईतिहासावर आम्हाला गर्व आहे त्या ईतिहासामध्ये सर्वात मोठा वाटा ओबीसी समाजाचा आहे असे रामचंद्र येईलवाड म्हणाले. त्याचे उदाहरण सांगतांना किल्ले बनविणारा गवंडी, सुतार यांचा उल्लेख केला. सोबतच शिंपी, कुंभार, चांभार अशा अनेक जाती प्रवर्गांचा उल्लेख करून ईतिहासाला तयार करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता हे आज आम्ही विसरलो आहोत असे येईलवाड यांना वाटते. ओबीसीहा या देशातील खरा शास्त्रज्ञ आहे. पण आज त्याची किंमत राहिली नाही. त्यामुळे ओबीसी जनगणना व्हावी आणि त्यानुसार पुढील वर्गीकरण करावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थानी आपल्या पुढील बैठकीत ओबीसी जनगणनेचा ठराव मंजुर करावा असे आवाहन येईलवाड यांनी केले आहे.
‘बोटावर शाई तेवढीच लोकशाही’-रामचंद्र येईलवाड