नांदेड(प्रतिनिधी)-“ब्रेक द चेन’ या कार्यक्रमानुसार कोविड परिस्थितीत तयार करण्यात आलेल्या विविध बंधनांना हळुहळू निर्गमित करणे सुरू आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी दि.13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सुचनांमध्ये दुकाने, उपहारगृहे, शॉपींग मॉल्स, विवाह सोहळे यांना मुभा दिली आहे. सिनेमागृहे, मल्टीप्लेक्स, धार्मिक स्थळे हे पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील असे आदेशात लिहिले आहे.
कोविड नियमावलीतील मुभा देतांना दि.13 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार खुली अथवा बंदीस्त उपहारगृहे आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेत कांही अटींवर सुरू करता येतील. ज्यामध्ये उपहारगृह, बारमध्ये प्रवेश करतांना, प्रतिक्षा कक्षात बसतांना किंवा जेवन मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य आहे. उपहारगृह आस्थापनांनी अशा स्पष्ट सुचना दर्शनी भागात लावायच्या आहेत. या आस्थापनामध्ये काम करणारे प्रत्येक व्यक्तीने कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरच सर्व कर्मचारी व व्यवस्थापन मास्कचा वापर करून काम करतील. वातानुकूलीत उपहारगृहामध्ये खिड्या-दरवाजे उघडे ठेवून खेळती हवा राखणे आवश्यक आहे. प्रसाधनगृहांमध्ये उच्च शक्तीचा एक्झॉस्ट फॅन बंधनकारक आहे. कोविड नियमावलीतील विहित शारिरीक अंतरानुसार बैठक व्यवस्था उपहारगृहांनी करावी. बार सुरू ठेवण्यास सर्व दिवस आणि रात्री 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात येत आहे. पार्सल सुविधा मात्र 24 तास सुरू ठेवण्यात मुभा देण्यात आली आहे.
सर्व व्यापारी आपली दुकाने सर्व दिवस आणि रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवू शकतील. यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शॉपींग मॉल्स सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरीकाकडे कोविड प्रमाणपत्र आवश्यक आहे. जिम्नॅशीयम, योग सेंटर, सलून आणि स्पॉ 50 टक्के क्षमतेत रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. इनडोअर स्पोर्टस असलेल्या ठिकाणी दोन लसीकरणाच्या मात्रा घेतलेल्या व्यक्तींना प्रवेश असेल. इनडोअर खेळांमध्ये दोन -दोन खेळाडूंनाच परवानगी देण्यात आली आहे.
सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बॅंक कर्मचारी, रेल्वे व मनपा कर्मचारी न.पा.कर्मचारी या सर्वांनी लसीकरण प्राधान्याने करून घ्यायचे आहे. ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रतिबंधात्मक लसीकरण झालेल्या ठिकाणी पुर्ण क्षमतेने काम सुरू करता येईल. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक आस्थापनाने विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलवावे. त्यामुळे गर्दीच्या वेळी रोगाचे संक्रमण होणार नाही. खाजगी कार्यालयानांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी 24 तास कार्यालय सुरू ठेवता येईल. जिल्ह्यातील सर्व मैदाने, उद्याने, स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार नियमित वेळेत सुरू राहतील.
विवाह सोहळयांबद्दल निर्देश देतांना खुल्या प्रांगणातील, लॉनवरील किंवा बंदीस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेत आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पुर्ण पालन करून करता येतील. 50 टक्के क्षमतेत सर्वाधिक माणसे 200 त्या सोहळ्यात भाग घेवू शकतील. बंदीस्त मंगल कार्यालयामध्ये 50 टक्के आणि जास्तीत जास्त 100 व्यक्ती विवाह सोहळ्यासाठी मर्यादा आहे. या ठिकाणी व्हिडीओ शुटींग होईल आणि चुकले तर कार्यवाही होईल. मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन, बॅंड पथक, भटजी, फोटो ग्रॉफर अशा विवाह संस्थेशी संबंधीत सर्व सलग्न संस्था या मधील व्यवस्थापक व त्यांचे कर्मचारी कोविड लसीकरण पुर्ण करून घेतलेले असावे. प्रत्येकाकडे ओळखपत्र आणि लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टीप्लेक्स बंद राहतील. सर्व धार्मिकस्थळे सुध्दा बंद राहतील. ज्या नागरीकांना दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करायचा आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक नाही. अन्य प्रवाशांसाठी 72 तासपुर्वीची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे. गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, निवडणुक प्रचार सभा, रॅली, मोर्चे यावर निर्बंध आहे.
मेडिकलमधील ऑक्सिजनची उपलब्धता मर्यादीत असल्याने राज्यातील रुग्ण संख्या वाढल्यास रुग्णांना उपचारासाठी प्रतिदिन 700 मेट्रीक टन किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन लागत असल्यास संपुर्ण राज्य लॉकडाऊन करून त्यानुसार कठोर निर्बंध लागू करण्यास राज्य शासनाने सुचित केले आहे. त्यामुळे मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारिरीक अंतराचे पालन, सार्वजनिक ठिकाणी थुंकने आदी बाबी निर्बंधीत आहेत.
‘ब्रेक द चेन’ नुसार कोविडसाठी नवीन सुचना ; धार्मिक स्थळे बंदच