नांदेड(प्रतिनिधी)-11 ऑगस्ट रोजी गोकुळनगर भागात घडलेल्या दरोड्याचे गुन्हेगार स्वातंत्र्य दिनाच्या उगवत्या सुर्यासह स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 3 लाख 56 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. उर्वरीत रक्कम सुध्दा जप्त करू असा विश्र्वास पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.पी.घोले यांनी या दरोडेखोरांन तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

दि.11 ऑगस्ट रोजी बालाजी ट्रेडर्स गोकुळनगर येथील या सिमेंट दुकानात खंजीरचा धाक दाखवून चोरट्यांनी 7 लाख 70 हजार रुपये रक्कम असलेली सुटकेस बळजबरीने चोरून नेली. या बाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 303/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 452, 34 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक फेरोज पठाण यांच्याकडे आहे.
जिल्ह्यात घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे अधिकार स्थानिक गुन्हा शाखेला असतात. पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी त्यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीचे सविस्तर सादरीकरण पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्याकडे केले. 15 ऑगस्ट रोजी सर्वत्र 75 व्या स्वातंत्र्य दिन महोत्सवाची धाम धुम सुरू असतांना स्थानिक गुन्हा शाखेने राहुल उर्फ मुन्ना महेंद्र थोरात (25) रा.श्रावस्तीनगर, विशाल व्यंकटी वाघमारे (25) रा.श्रावस्तीनगर, संतोष आनंदाराव झडते (23) रा.श्रावस्तीनगर, दिपक नरहरी वाघमारे (26) रा.कोटीतिर्थ या चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बालाजी ट्रेडर्समधील दरोड्याच्या रक्कमेतील 3 लाख 56 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील मारोती उर्फ बाळू हरीभाऊ सरोदे हा एक गुन्हेगार अद्याप फरार आहे. या गुन्हेगाराला लवकरच पकडू आणि दरोड्यातील उर्वरीत रक्कम जप्त करू असे द्वारकादास चिखलीकर यांनी सांगितले.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी अवघ्या चार दिवसात दरोडेखोरांना पकडणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे, दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, संजय केंद्रे, बालाजी तेलंग, शंकर म्हैसनवाड, अफजल पठाण, देविदास चव्हाण, विलास कदम, गणेश धुमाळ, राजेंद्र सिटीकर, बजरंग बोडके, राजू पुल्लेवार, हनुमानसिंह ठाकूर, बालाजी मुंडे यांचे कौतुक केले आहे.
पकडलेल्या चार दरोडेखोरांना सहाय्यक पोलीस निरिक्षक फेरोज पठाण यांनी न्यायालयात हजर केले. केलेल्या दरोड्यातील तपासात प्रगती करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा न्यायालयासमक्ष मांडला. न्यायाधीश आर.पी.घोले यांनी या चार दरोडेखोरांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.