नांदेड(प्रतिनिधी)-नोकराने दुकानात चोरी केल्यानंतर त्याच्याकडून बॉन्ड पेपर लिहुन घेण्यात आला आणि त्यानंतर त्या नोकराविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची किमया वजिराबाद पोलीसांनी 19 ऑगस्ट रोजी केली आहे.
अनिल गोपालदास हिराणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 मे 2021 रोजी मी माझ्या दुकानाकडे आणि गोदामाकडे चक्कर मारली. माझ्या दुकानाचे नाव महालक्ष्मी ईलेक्ट्रॉनिक्स महाविर चौक असे आहे तर माझे गोडाऊन देविदास कॉम्प्लेक्स गुरूद्वारा रोड येथे आहे. दुसरे गोडाऊन मराठा खानावळजवळ नवा मोंढा येथे आहे. माझ्या दुकानाच्या शेजारील महामुने मशिनरी या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला असता माझ्या दुकानातील नोकर आणि दुसऱ्या दुकानाचा मालक एका ऍटोमध्ये, एकदा रिक्षामध्ये आणि दोनदा मोटारसायलवर माझ्या दुकानातील साहित्य घेवून जातांना दिसले. माझ्या दुकानातील हे साहित्य परस्पर विक्री करण्यात आले.
माझ्या दुकानातील ईलेक्ट्रॉनिक्स वस्तु किंमत 5 लाख रुपयांचे साहित्य चोरून नेण्यात आले आहे. त्यानंतर 26 मे रोजी माझ्या येथे चोरी करणारा नोकर आणि दुसरा दुकानदार यांना मनिष हिराणी यांच्या दुकानात बोलावून विचारणा केली. त्याने अनेक साक्षीदारांसमक्ष गोडाऊनमधून इलेक्ट्रॉनिक्स साहित्य चोरून नेल्याची कबुली दिली आणि ते साहित्य 1 लाख 80 हजार रुपयांना विक्री केले. या बाबतची व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यात आली. त्यानंतर चोरीचा माल खरेदी करणाऱ्या दुकानदारांने मी तीन हप्त्यामध्ये 1 लाख 80 हजार रुपये परत करतो असे सांगून ते बॉन्ड पेपरवर लिहुन दिले आणि मी माणुसकी या नात्याने पोलीस कार्यवाही केली नाही.
हा सर्व प्रकार मे मध्ये घडला. त्यापुर्वी 26 मार्चपासून माझी तब्बेत बिघडली होती. मी कोविड आजारी होतो. 4 एप्रिल ते 10 एप्रिल आजारी होतो. मला अशक्तपणा जाणवत असल्याने मे महिन्यात घरीच आराम करीत होतो. आता माझी तब्बेत बरी झाल्यानंतर मी 19 ऑगस्टला तक्रार देत असल्याचे या फिर्यादीत लिहिले आहे.
या फिर्यादीला वाचल्यानंतर फिर्यादी आजारी होता तरी त्याने 26 मे रोजी मिटींग घेवून कबुल नामा बॉन्डवर लिहुन घेतला, चोरांची रेकॉर्डींग केली आणि आता ऑगस्ट महिन्यात हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर तपासणी झाली तर कांही तरी नवीनच सत्य समोर येईल असे वाटते. या गुन्ह्याच्या एफआयआरची माहिती देवून विधीज्ञाला विचारणाला विचारणा केली असता चोरीचा व्यवहार अगोदर देण्या-घेण्यात बदलला म्हणजे हा गुन्हा होवू शकत नाही असे विधीज्ञांनी सांगितले.
चोरांकडून बॉन्ड पेपरवर कबुल नामा लिहुन घेतल्यानंतर वजिराबाद पोलीसांनी दाखल केली चोरीची तक्रार