दुकानाबाहेर सरकार मान्य बोर्ड आणि त्यावर गडद लाल रंगाचा पडदा
नांदेड(प्रतिनिधी)-सरकार मान्य असा बोर्ड लावून दुकानात गुडगुडी चालवली जाते.हे सरकार मान्य काय आहे याची तपासणी कोण करेल. लोकांना तर अगोदर डब्यातली गुडगुडी त्यानंतर चक्रीमधली गुडगुडी आता विसरायची वेळ आली असतांना नवीन ऑनलाईन गुडगुडीचा सरकार मान्य प्रकार सुरू झाला आहे.
गुडगुडी हा प्रकार अगोदर एका डब्यात शकुनी मामाचे पासे टाकून खेळला जायचा. डब्यात पासा टाकून डब्बा उलटा ठेवला जायचा आणि मग 1 ते 6 आकड्यांवर पैसे लावून डब्बा उघडला जायचा ज्याचा आकडा आला असेल त्याला त्या प्रमाणात पैसे मिळायचे. पुढे एका गोल चक्रामध्ये 1 ते 10 आकडे आले. हा गुडगुडीचा सुधारीत प्रकार सुरू झाला. पण आता हे दोन्ही प्रकार दिसेनासे झाले आहेत. पुर्वी जत्रांमध्ये हा गुडगुडी प्रकार खुपच फेमस होता. कांही जणांना तो आवडायचा. ज्यांना तो आवडायचा ते त्याची परवानगी द्यायचे आणि ज्यांना तो आवडायचा नाही ते पोलीस अधिकारी गुडगुडीवाल्याची सोलासोल करायचे. पण सध्या तरी गुडगुडीचे दोन प्रकार सहज दृष्टीपथात पडत नाहीत.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी ज्यावेळी कॉम्प्युटर आणले त्यावेळी त्यांच्याविरुध्द माणसाच्या हाताला काम राहणार नाही अशी ओरड झाली. पण आज शासकीय कामे सुध्दा ऑनलाईन झाली आहेत. हिशोब लिहिणारी मंडळी अगोदर कलम घेवून कागदावर हिशोब लिहित होती. आता ते सुध्दा टॅली या सॉफटवेअरमुळे सहज झाले आहे. एखादी नवीन गोष्ट येते तेंव्हा ती अडचणीची वाटते पण त्यातूनही मार्ग निघतात आणि नवीन-नवीन कामे त्याद्वारेच सुरू होतात मग त्याचे महत्व कळते. ज्या लोकांनी 1985 ते 90 च्या दशकात राजीव गांधी यांच्याविरुध्द ओरड केली होती. त्यावेळेतील जे लोक आज जीवंत आहेत ते आज राजीव गांधी यांना धन्यवाद देतात. कारण त्यांनी कॉम्प्युटर आणले आहे.
संगणकाने क्रिकेटचा जुगारसहज केला तसेच लॉटरी सहज केली. आज शहरात जवळपास 30 ते 40 ठिकाणी ही ऑनलाईन लॉटरी संगणकाच्या माध्यमातून अर्थात गुडगुडीप्रमाणे सुरू आहे. ज्या-ज्या ठिकाणी अशी दुकाने आहेत त्या-त्या ठिकाणी बाहेर महालक्ष्मी लिहिलेला आणि त्यावर सरकार मान्य असे लिहिलेला बोर्ड लावलेला असतो. हे सर्व सरकार मान्य असेल तर त्या दुकानासमोर गडद लालरंगाचा पडदा का लावला जातो हे मात्र कोणालाही शोधता आले नाही. गुडगुडीचाच धंदा आता संगणकाच्या माध्यमातून सुरू झाला आहे. पण सरकार मान्य लिहिलेल्या या दोन शब्दांची तपासणी कोणी करतच नाही. बहुदा तेथून काही थोडे बहुत तुप सर्वांना मिळत असेल म्हणून सरकारचीच मंडळी सरकार मान्य या शब्दांकडे दुर्लक्ष करते. असे होणे म्हणजे आता लोकशाही खऱ्या अर्थाने “दब्बर’ झाली असल्याचे वाटायला लागले आहे.
सरकार मान्य लिहुन गुडगुडीचा खेळ ऑनलाईन सुरू