नांदेड (प्रतिनिधी)- भोकर येथील एका डॉक्टरचे घर फोडून चोरट्यांनी 3 लाख रूपये लंपास केले आहेत. हिमायतनगर येथे एक कुटूंब घरात नाही याची संधी साधून चोरी करण्यात आली आहे. इतवारा ठाण्याच्या हद्दीत पाण्याच्या हौदावरील साहित्य चोरीला गेले आहे.
डॉ. किरण बालाजीराव पांचाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लक्ष्मीनारायण रूग्णालय, अष्टविनायक नगर भोकर येथे त्यांच्या राहत्या घरातील तळमजल्याच्या दवाखान्याचे गेट वाकून कोणीतरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि टेबलच्या रकान्यात ठेवलेले 3 लाख रूपये चोरून नेले आहेत. हा घटनाक्रम 21 ऑगस्टच्या पहाटे 5 वाजेच्या दरम्यान घडला आहे. भोकर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.
किशोर गजानन श्रीनाथ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान त्यांचे सर्व कुटूंब घराला कुलूप लाऊन बाहेर गेले असताना कोणीतरी चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि 16 हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे चोरून नेले आहेत. हिमायतनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार हेमंत चोले अधिक तपास करीत आहेत.
अब्दुल सलीम खान बिसमिल्ला खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 ऑगस्टच्या मध्यरात्री 1 वाजता उर्दू घर, देगलूर नाकाच्या पाठीमागे पाण्याच्या हौदावर बसविलेले 1457 रूपये किंमतीचे तीन प्रेशर गेज चोरून नेले आहेत. इतवारा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शकील अधिक तपास करीत आहेत.
भोकर येथील लक्ष्मीनारायण दवाखान्यातून 3 लाख चोरले