नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या सख्या छोट्या भावाचा खून करतांना आपल्या दोन्ही मुलांची मदत घेणार्या भावामुळे एका कुटूंबाचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे. हा प्रकार तुप्पा पाटी जवळ २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घडला.
तिरुपती साहेबराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वडील साहेबराव कदम आणि काका तातेराव कदम यांच्यामध्ये शेतीच्या वाटणीवरून बरेच वाद सुरू होते. आज दि.२२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्यासुमारास साहेबराव कदम हे तुप्पा पाटी जवळ असतांना काका तातेराव पांडूरंग कदम (५०), त्यांचे पुत्र बालाजी (२२) आणि ऋषीकेश (२०) या तिघांनी मिळून माझे वडील साहेबराव पांडूरंग कदम यांचा तिक्ष्ण हत्याराने वार करून खून केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी तातेराव पांडूरंग कदम यांचे पुत्र बालाजी आणि ऋषीकेश यांच्याविरुध्द साहेबराव पांडूरंग कदम (५५) वर्ष रा.तुप्पा यांचा खून केला या सदरात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील नवनियुक्त, जबरदस्त सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांच्याकडे देण्यात आला आहे.
शेतीच्या वादातून भावाने केला भावाचा खून