नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेल्याप्रकरणात सिंदखेड पोलीसांनी पोक्सो कलम न जोडल्यामुळे बालिकेच्या वडिलांनी पोलीस उपमहानिरिक्षक आणि पोलीस अधिक्षक यांना पत्र दिले असून सिंदखेड पोलीसांविरुध्द कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.सिंदखेड हे पोलीस स्टेशन अपर पोलीस अधिक्षक भोकर विजय कबाडे यांच्या कार्यक्षेत्रातील आहे.
सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेच्या पित्याने 23 ऑगस्ट रोजी पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालय आणि पोलीस अधिक्षक कार्यालय येथे दिलेल्या अर्जानुसार त्यांच्या मुलगी 17 वर्ष वयाची असतांना शुभम राजू चंदेल नावाच्या युवकाने तिला पळून नेले होते. त्याबाबत सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 122/2021 कलम 363 नुसार दाखल झाला होता. सिंदखेड पोलीसांनी त्या अल्पवयीन बालिकेला तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथून आरोपीसह ताब्यात घेतले होते. आरोपीला सिंदखेड पोलीसांनी न्यायालयीन कोठडीत पाठवून दिले आहे. माझी मुलगी 17 वर्ष वयाची असून पोलीसांनी तिला आणल्यानंतर पोक्सो कायद्याची वाढ त्या गुन्ह्यात केलेली नाही आणि आरोपीला पोलीस कोठडी न मागता थेट न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची घाई केली आहे. माझी मुलगी मला सांगत आहे की, शुभम चंदेलने जीवे मारण्याची धमकी देवून तिच्यावर अत्याचार केला आहे.तरी सिंदखेड पोलीसांना योग्य आदेश द्यावेत अशी विनंती या अर्जात करण्यात आली आहे.
आपल्याच कार्यक्षेत्रात दुर्लक्ष?
सिंदखेड पोलीस ठाणे हे अपर पोलीस अधिक्षक कार्यालय भोकर यांचे कार्यक्षेत्र आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे हे अनेकदा सुट्टीवर गेल्यानंतर भोकरचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी नांदेड जिल्हा अत्यंत दमदारपणे सांभाळला आहे. पण सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन बालिकेच्या वडीलांनी दिलेल्या या अर्जानंतर आपल्यामुळ कार्यक्षेत्राकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे काय? असा प्रश्न तयार झाला आहे.
पोक्सो कायदा गुन्ह्यात जोडा; अल्पवीन बालिकेच्या वडीलांची मागणी