नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी नदीच्या काठावर ब्राम्हणवाडा येथे महसुल विभागाने 20 ब्रास रेती, कांही तराफे आणि 6 रिकामे टिप्पर जप्त करून तीन लोकांविरुध्द गौण खनीज कायदा, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, पर्यावरण संरक्षण अधिनिमय आणि भारतीय दंडसंहितेतील चोरी या सदरांखाली गुन्हा दाखल केला आहे. पण तीन टिप्पर चालकांविरुध्द गुन्हा दाखल करून मालक मात्र पळून गेल्याचे तक्रारीतच लिहिलेले आहे. मालकांवर कांही कार्यवाही होणार की, नाही हा प्रश्न समोर आला आहे. कालच पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रेती माफियांना राजकीय आश्रय असल्याशिवाय ते मस्ती करू शकत नाहीत असे वक्तव्य केले होते. मग अशोक चव्हाण यांचे शब्द खरे आहेत असे या कार्यवाहीनंतर वाटत आहे.
मंडळाधिकारी चंद्रकांत प्रभु कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.24 ऑगस्टच्या दुपारी 2.30 वाजेच्यासुमारास त्यांनी व त्यांच्या पथकाने, मुदखेड पोलीस अधिकारी व अंमलदारांसह ब्राम्हणवाडा ते पाथरड जाणाऱ्या रस्त्यालगत गोदावरी काठावर तपासणी केली. तेथे 20 ब्रास रेती काढून ठेवली होती. गोदावरी नदीतून बाहेर रेती काढण्यासाठीचे 6 तराफे आणि 6 रिकामे टिप्पर तेथे सापडले. ही सर्व मालमत्ता 32 लाख 12 हजार रुपयांची आहे.
चंद्रकांत कांबळे यांच्या तक्रारीवरुन टिप्पर चालक उत्तमराव कोंडजी सोनटक्के, दत्ता भगवान सोनटक्के दोघे रा.ब्राम्हणवाडा आणि संतोष आवातीरक रा.पाथरड या तिघांची नावे आरोपी रकान्यात लिहिलेली आहेत. सोबतच इतर टिप्परचे चालक व मालक पळून गेल्याचे लिहिले आहे. या लोकांविरुध्द मुदखेड पोलीसांनी गुन्हा क्रमांक 150/2021 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.
कालच पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कोणतेही गुंड राजकीय आश्रयाशिवाय राहुच शकत नाहीत असे सांगितले होते. त्यामध्ये त्यांनी वाळू माफिया असे नाव पण घेतले होते. आज तीन टिप्पर चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. पण रेती माफिया असलेल्या मालकांना यातून माफ केले जाईल काय हा प्रश्न सुटलेला नाही.
ब्राम्हणवाडा येथे रेती चोरणाऱ्या लोकांचा 32 लाखांचा मुद्देमाल जप्त