नांदेड(प्रतिनिधी)- तीन दरोडेखोरांनी वात्सल्यनगर सिडको भागात दुपारी 1 वाजेच्या सुमारास लाखो रूपयांचा ऐवज लुटल्याचा प्रकार घडल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन दरोडेखोरांना ऐवजासह ताब्यात घेतले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
रमेश राम दाचावार यांच्या घरात दुपारी फक्त महिला होत्या आणि या संधीचाफायदा घेत तीन चोरट्यांनी आपले तोंड बांधून घरात प्रवेश केला आणि चाकूच्या धाकावर घरातील रोख रक्कम आणि सोने लुटून नेले. याबाबत वेगवेगळ्या चर्चा आहेत. या प्रकरणी 50-60 तोळे सोने, एक किलो चांदी आणि 2 लाख रूपये रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटल्याची माहिती गुन्हा क्र. 602/2021 च्या प्राथमिक खबरीमध्ये लिहिलेली आहे.
चोरी घडल्यानंतर गुन्हे शोध पथकाचे प्रमुख शेख असद, पोलीस उपनिरीक्षक संकेत दिघे यांनी अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपअधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि सुर्यास्त होण्याअगोदरच अर्थात सहा तासांतच दरोडेखोरांना लुटलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेली ही मेहनत प्रशंसनीय आहे. पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दरोडेखोरांना पकडणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणात एक आरोपी दाचावार यांच्या घरातीलच व्यक्ती असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्या व्यक्तीसोबत इतर काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
लाखोंचा ऐवज लुटणारे दरोडेखोर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याने सहा तासांत पकडले