नांदेड(प्रतिनिधी)-आपल्याच घरात चोरी करायला लावून 18 लाखांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी काही तासातच गुन्हेगारांना जेरबंद करणाऱ्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील कांही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज 27 ऑगस्ट रोजी गुन्हे परिषदेत पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सन्मान केला. पकडलेल्या तीन आरोपींना पाचव्या मुख्य न्यायदंडाधिकारी मनिषा कुलकर्णी यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास वात्सल्यनगर सोसायटी सिडको येथील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रमेश रामचंद्र दाचावर यांच्या घराचे दार वाजल्यानंतर त्या घरातील सुनबाई अंकिता यांनी दार उघडले. तोंड बांधलेले तीन जण आत घुसले आणि त्यांनी अंकिताला मारहाण करून चाकुच्या धाकावर पैसे असलेल्या कपाटाच्या चाब्या घेतल्या. त्यातून 52 तोळे सोने किंमत 15 लाख 60 हजार रुपये, 1 किलो चांदी किंमत 40 हजार रुपये आणि 2 लाख रुपये रोख रक्कम, 10 हजार रुपयांचा एक मोबाईल असा एकून 18 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज बळजबरी चोरून पळून गेले.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याला ही माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.जी.कासले, संकेत दिघे, पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांनी अत्यंत जलदगतीने सिडको भागातील अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन जण एका दुचाकीवर बॅग घेवून जातांना दिसले. दोन सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि एक पोलीस उपनिरिक्षक यांनी तोंडी आदेशाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड यांच्या आदेशांना मानत कांही तासातच आरोपी ताब्यात घेतले. त्यामध्ये एक जण विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचेही सांगण्यात आले.
याप्रकरणी रमेश रामचंद्र दाचावार यांच्या तक्रारीवरुन तीन अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला. आरोपीतांना 26 ऑगस्टच्या रात्री 11 वाजता अटक करण्यात आली. आज दि.27 ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.जी.कासले आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार यांनी याप्रकरणातील श्रीनिवास दिलीप दाचावार (28), कृष्णा उर्फ अव्या संजय मोरे (25) आणि आकाश बालाजी गोगदरे (20)या तीन जणांना न्यायालयात हजर केले. न्यायालयात सादर केलेल्या विनंतीमध्ये या दरोडेखोरांकडून एम.एच.26 बी.जी.4911 ही दुचाकी गाडी जप्त करण्यात आल्याचे लिहिले आहे. त्यांच्याकडून अद्याप 18 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करणे शिल्लक आहे. म्हणून त्यांना पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती केली. सरकारी वकील ऍड.विजय तोटेवाड यांनी मांडलेली बाजू विचारात घेवून न्यायाधीश मनिषा कुलकर्णी यांनी या तिघांना तीन दिवस अर्थात 31 ऑगस्ट 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
काही तासात दरोडेखोर जेरबंद करणाऱ्यांचा सत्कार
आज पोलीस अधिक्षकांची मासिक गुन्हे परिषद होती. यात जिल्ह्यातील सर्व अधिकारी येत असतात. या परिषदेत अत्यंत कमी वेळात दरोडेखोर जेरबंद करणाऱ्या नांदेड ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.जी. कासले, संकेत दिघे, पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांचा पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सन्मान केला. शेख असद यांची बदली इतवारा पोलीस ठाणयात झाली आहे. पण त्यांना बदलीच्या ठिकाणी अद्याप सोडण्यात आले नाही. आपल्या कार्यकाळात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांना अनेकदा टोमणे ऐकावे लागले तरीपण दरोडा झाल्यानंतर माझी बदली झाली आहे याचा विचार न करता गुन्हेगारांना जेरबंद करणे हे आपले कर्तव्य आहे ही भावना ठेवूनच शेख असद यांनी केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना सन्मानाच्या रुपात मिळाले.
आपल्याच घरात दरोडा टाकणाऱ्यास साथीदारांसह पोलीस कोठडी