सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-कोंबड्यांच् या खुराड्याला चारही बाजूने लाकडी खुंटे रोवून त्यात विद्युत तारांचा प्रवाह सोडल्यामुळे मौजे कंजारा (बु) ता.हदगाव येथे एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या शेत मालकाला पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली तेंव्हा तामसा प्राथमिक आरोग्य केंद्राने त्याची रवानगी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात केली आहे आणि तो उपचार घेत आहे.
कंजारा ता.हदगाव येथील पांडूरंग तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास कंजारा येथील गावठान जागेत असणाऱ्या झोपड्यांसमोर लक्ष्मण उकंडजी जाधव (52) यांच्या कोंबडीच्या खुराड्याला लाकडी खुंटे बांधून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. त्या विद्युत प्रवाहाने बाबूराव गणपतराव चव्हाण (65) रा.कंजारा यांना विद्युत शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. बाबूराव चव्हाण यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे प्रेत बाजीराव मारोती चव्हाण यांच्या शेतात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एखाद्याचा मृत्यू होवू शकतो. हे माहित असतांना सुध्दा लक्ष्मण उकंडजी जाधव यांनी विद्युत प्रवाह तारांमध्ये सोडून बाबूराव गणपतराव चव्हाण यांच्या मृत्यूस कारण ठरले आहेत. याबाबत तामसा पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 304, 201 प्रमाणे गुन्हा क्रमांक 154/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक एल.आर.घुगे यांच्याकडे देण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तामसा पोलीसांनी विद्युत तारांमध्ये प्रवाह सोडणाऱ्या लक्ष्मण उकंडजी जाधव (52) यांना ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली तेंव्हा तामसा प्राथमिक आरोग्य केंद्राने तांना असलेल्या रोगांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे पाठविले आहे. सध्या लक्ष्मण जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत.