किरण स्पोर्टस् असोसिएशनचा कार्यक्रम
नांदेड(प्रतिनिधी)-26 ते 29 ऑगस्ट दरम्यान जंनसेरीयो कराटे खेळाडूंनी घेतलेल्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्रांची वितरण करण्यात आले. हा ट्रेनिंग कॅम्प शिहान संदीप गाढे आणि लक्ष्मण फुलारी यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता.
29 ऑगस्ट हा दिवस भारताचे नामवंत हॉकी पटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन याच दिवशी राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा होतो. किरण स्पोर्टस् असोसिएशन दिपनगर, तरोडा (बु) येथे मेजर ध्यानचंद जयंती आणि राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सौ.संध्याताई बालाजीराव कल्याणकर या अध्यक्षपदावर विराजमान होत्या. या कार्यक्रमात विशेष उपस्थितीत जंनसेरियो कराटे हे भारतातील प्रमुख संदीप गाढे हे उपस्थित होते. या कार्यक्रमात इतर उपस्थितांमध्ये नांदेडचे क्रिडा अधिकारी गुरदिपसिंघ संधू, प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे, संदीप वाघचौरे, शेख नजीर यांचा समावेश आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील जालना, ठाणे, पुणे आणि नांदेड येथील रोहण गायकवाड, नेहा सूरनर या जंनसेरियो कराटे खेळाडूंना ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आले. जिम्नॅस्टिक खेळाडूंनी आपले प्रात्यक्षीक दाखवले. उपस्थित मान्यवरांनी कराटे व जिम्नॅस्टिक याबाबत मार्गदर्शन करून खेळाडूंचे मनोबल वाढविले, त्यांचे कौतुक केले. किरण स्पोर्टस असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व प्रशिक्षकांनी पुढील वाटचालीसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.