नांदेड (प्रतिनिधी)- हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालिकेसोबत लग्न करणाऱ्या एका नवरदेवाला सिनेस्टाईलने पकडून हा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले.
तहसील कार्यालयात एक निवावी पत्र दाखल झाले. त्यानुसार हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन बालिकेचा विवाह होणार आहे. तहसील कार्यालय, पोलीस विभाग आणि बालविकास प्रकल्प अधिकारी याची तपासणी केली तेव्हा शाळेच्या उताऱ्यानुसार या बालिकेचे वय 12 वर्षे 9 महिने होते. बालिकेबाबत कोणतीच माहिती तात्काळ प्राप्त होऊ शकली नाही. पण पोलीस विभागाच्या मदतीने बालिकेसोबत विवाह करणाऱ्या नवरदेवाला मात्र सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुलीचे आई-वडील, मुलाकडील मंडळी यांना मुलीची काळजी, बालविवाह प्रतिबंधक कायदा याबाबत सविस्तर जाणुन घेण्यासाठी त्यांना बालकल्याण समिती समक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले.
हा बालविवाह रोखण्यासाठी तहसीलदार जीवराज डापकर, पोलीस निरीक्षक हनमंत गायकवाड, महिला व बालविकास अधिकारी शेख रशीद, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम, गोविंद खैरे, जिल्हा बाल संरक्षण विद्या आळणे, संरक्षण अधिकारी सोनारकर तसेच स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाने मेहनत घेतली.
हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालविवाह रोखण्यास प्रशासन यशस्वी